अचलपूर मतदारसंघातील ६०० किलोमीटर पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:13 AM2021-04-23T04:13:14+5:302021-04-23T04:13:14+5:30
चांदूर बाजार : ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ...
चांदूर बाजार : ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील पांदण रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. शेत शिवारातील पांदण रस्त्यांच्या पूर्णत्वाने ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे. त्या अनुषंगाने अचलपूर मतदारसंघात ६०० किलोमीटर पांदण रस्ते तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
तीन किलोमीटर रस्ता तयार होणार आहे. याचा संपूर्ण कृती आराखडा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला सादर केला आहे. त्यानुसार नवीन कमी खर्चाच्या कृती आराखड्यानुसार सर्वप्रथम अचलपूर मतदारसंघात ६०० किलोमीटरचे पांदण रस्ते तयार करण्यात येत आहे. या पांदण रस्त्यांसाठी राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अचलपूर मतदारसंघात हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर पांदण रस्त्यांचे कामाचे नियोजन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कृती आराखड्यानुसार होणार आहे.
अचलपूर मतदारसंघातील ६०० किलोमीटर नव्याने होणाऱ्या पांदण रस्त्यांमध्ये चांदूरबाजार तालुक्यातील २४३ किलोमीटर व अचलपूर तालुक्यातील २३७ किलोमीटर रस्ते पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये चांदूरबाजार तालुक्यातील २८६ व अचलपूर तालुक्यातील २७३ पांदण रस्त्यांचा समावेश आहे. तसेच मागील वर्षी अपूर्ण राहिलेली पांदण रस्त्यांची कामे यावर्षी प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात येणार आहे. या पांदण रस्त्यांमुळे शेतालाच नव्हे, तर प्रत्येक गावाला जाणारे अंतर्गत रस्ते तयार होणार आहेत. शिरजगाव बंड येथून सुरुवात करण्यात आली आहे.