संप मिटेना, अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घेण्याचे आदेश
By जितेंद्र दखने | Published: January 2, 2024 09:43 PM2024-01-02T21:43:05+5:302024-01-02T21:43:15+5:30
प्रशासनाला आयुक्त रुबल अग्रवाल यांचे आदेश
अमरावती: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी आहार पुरवठ्याची, अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या साहाय्याने अंगणवाड्यांचा पंचनामा करुन पर्यवेक्षिकांनी तत्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात, असे आदेश दिले आहेत.
अंगणवाडी ही शासकीय मालमत्ता असून संबंधित ग्रामपंचायतीच्या साहाय्याने अंगणवाडी सेविकांच्याकडून पंचनामा करून अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी तत्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात. नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष पंचनामे करावेत. चावी देण्यास टाळाटाळ झाल्यास कायदेशीर कारवाई करावी. अंगणवाडी केंद्रातील आहार शिजवणे व आहाराचे वाटप ग्रामपंचायतीमधील शिपाई, डाटा एन्ट्री ऑपरेटर करणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेची परिणामकारकपणे अंमलबजावणी व्हावी. तसेच शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना किमान ३०० दिवस आहार पुरवठा करण्यासाठी आहार वाटपाची पर्यायी व्यवस्था व्हावी यासाठी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या संपामुळे आयुक्ताकडून चाब्या घेण्याचे निर्देश आले आहेत. मात्र जिल्ह्यात सध्या बचत गट, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या माध्यमातून मुलांना पोषण आहार दिला जात आहे. त्यामुळे सध्या तरी एकाही अंगणवाडी केंद्राच्या चाब्या ताब्यात घेतलेल्या नाहीत.
- डॉ. कैलास घोडके, डेप्युटी सीईओ, महिला व बालकल्याण