आयुक्तांची खुर्ची उड्डाणपुलास टांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:12 PM2018-03-13T23:12:40+5:302018-03-13T23:12:40+5:30

शहरातील रखडलेल्या कामांना आयुक्त हेमंत पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची दालनाबाहेर काढली. ती उड्डाणपुलाला टांगण्यात आली.

Commissioner's chair hanging on the Flybridge | आयुक्तांची खुर्ची उड्डाणपुलास टांगली

आयुक्तांची खुर्ची उड्डाणपुलास टांगली

Next
ठळक मुद्देयुवा स्वाभिमानचा ‘गनिमी कावा’ : प्रशासनप्रमुखांचा निषेध

आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहरातील रखडलेल्या कामांना आयुक्त हेमंत पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची दालनाबाहेर काढली. ती उड्डाणपुलाला टांगण्यात आली. मंगळवारी दुपारी झालेल्या या आंदोलनामुळे महापालिका आवारात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ती खुर्ची शहर कोतवालीने जप्त केली व आयुक्तांच्या दालनात आणून ठेवली. लोकप्रतिनिधींशी त्यांचे वागणे सौजन्यपूर्ण नसल्याचा आरोप करत युवा स्वाभिमानने पवार यांच्या खुर्चीवर लत्ताप्रहार केला.
पीएम आवास योजना, रमाई आवास योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मालमत्ता मूल्यांकन प्रकल्प, छत्री तलावाचे सौंदर्यीकरण आणि इतर विकासकामे आयुक्तांच्या कचखाऊ वृत्तीने रखडलीत. अस्वच्छतेलाही तेच जबाबदार असल्याचा आरोप आ. रवि राणाप्रणीत युवा स्वाभिमान संघटनेने केला. पवार यांचा निषेध नोंदवत युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आयुक्तांच्या दालनात शिरले व त्यांनी खुर्ची बाहेर काढून राजकमल चौकातील उड्डाणपुलाला टांगली. यावेळी त्यांनी निदर्शने केली. आयुक्त पवार आंदोलनावेळी दालनात उपस्थित नव्हते. आयुक्तांच्या दालनासमोर चार सुरक्षा रक्षक असताना युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांना कुणीही अडविले नाही. खुर्चीला दोर बांधून ती उड्डाणपुलावरून काही अंतरावर लोंबकळत सोडण्यात आली. या आंदोलनाची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. या आंदोलनापूर्वी आ. राणा आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे.

अधिकाऱ्यांना बैठकीची सूचना
आ. रवि राणा दुपारी १.३० वाजता विविध विषयांवर आढावा बैठक घेणार आहेत, अशी सूचना राणा यांच्या कार्यालयाकडून मनपा प्रशासनाला देण्यात आली. आयुक्तांच्या अनुपस्थितीत उपायुक्तांसह सर्वच विभागप्रमुख त्यासाठी आयुक्तांच्या दालनाशेजारी असलेल्या कॉन्फरंस हॉलमध्ये एकत्र आले. मात्र, प्रत्यक्षात राणा बैठकीसाठी आलेच नाहीत. अधिकाऱ्यांना सभागृहात ठेवून युवा स्वाभिमानच्या अभिजित देशमुख, शैलेंद्र कस्तुरे व अन्य जणांनी आयुक्तांची खुर्ची पळविली. दरम्यान आयुक्त हेमंत पवार हे १५ दिवस रजेवर गेले आहेत.
कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल
महापालिका आयुक्तांच्या दालनातून त्यांची खुर्ची पळविणाऱ्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी आरोपी अनूप अग्रवाल, अभिजित देशमुख, नितीन सोळंके, मंगेश कोकाटे, रौनक किटकुले, निलेश शहा, श्याम नरवणे, अमर काळमेघ, संगीता काळबांडे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४४८, ४२७, १४७, १४९, सह कलम १३५ कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Commissioner's chair hanging on the Flybridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.