आयुक्तांच्या ‘सोशल पोलिसिंग’ला तडा

By admin | Published: November 29, 2015 12:59 AM2015-11-29T00:59:32+5:302015-11-29T00:59:32+5:30

शहर पोलीस दलातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या गुन्हे शाखेत माजलेल्या अंतर्गत बेदिलीवर लवकरच ‘रामबाण’ उपाय शोधण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

The Commissioner's 'Social Police' | आयुक्तांच्या ‘सोशल पोलिसिंग’ला तडा

आयुक्तांच्या ‘सोशल पोलिसिंग’ला तडा

Next

गुन्हे शाखेत फेरबदलाचे संकेत : ‘गोपाल’काल्याला ब्रेक मिळणार
अमरावती : शहर पोलीस दलातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या गुन्हे शाखेत माजलेल्या अंतर्गत बेदिलीवर लवकरच ‘रामबाण’ उपाय शोधण्याचे संकेत पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. बंडफितुरीमुळे गुन्हे शाखेतील काहींनी ‘टीप’ प्रकरणाचा ‘गोपाल’काला केल्याचा आरोप होत असताना आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाचा तपास स्वत:कडे घेत संभाव्य दगा फटक्याला त्यांनी दूर सारल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते. ट्रकसंदर्भातील टीप प्रकरण आणि त्यापाठोपाठ देशी कट्टा प्रकरणात गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे प्रमुखांमधील परस्पर असमन्वय चव्हाट्यावर आल्याने आयुक्त गंभीर बनले आहेत. त्यातल्या त्यात ‘टीप’ प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशीदरम्यान अधिकारी दर्जाच्या व्यक्तींविरोधात ‘आरोप’ झाल्याने ठोस कारवाईनंतर पुढे ‘मॅट’मध्ये त्याला कसे सामोरे जायचे, याबाबतही आयुक्त विचारपूर्वक पाऊल टाकत असल्याची चर्चा आहे. ‘जे काही होईल ते ठोस होईल’ या आयुक्तांच्या वक्तव्याला त्यामुळेच विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लागोपाठ घडलेल्या या प्रकरणाने आयुक्तांच्या सोशल पोलिसिंगला तडा गेला आहे. रियाजोद्दीन देशमुख यांची आयुक्तालयातून बदली झाल्यानंतर हे महत्वाचे पद प्रमेश आत्राम यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यापूर्वीसुद्धा आत्रामांनी गुन्हे शाखा अनुभवली होती. उपनिरीक्षक ते गुन्हे शाखेचे निरीक्षक असा लांब पल्ला त्यांनी आयुक्तालयातच गाठला. असा अनुभवी अधिकारी असताना गुन्हे शाखेत माजलेली अंतर्गत बेदिली 'अर्थ'पूर्ण संशयाला वाव देणारी ठरते.
गुन्हे शाखेतील 'क्रिम पोस्टिंग' मिळविण्यासाठी मोठी लॉबिंग केली जाते, हे सर्वश्रूत आहे. ‘पीआर’ चांगला असणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची गुन्हे शाखेत वर्णी लागते. तथापि गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा ‘पीआर’ आणि अनुभव फिल्डमध्ये दिसेनासा झाला आहे.
पोलीस मित्र, वाहन चालकांना समुपदेशन, महिलांसाठी आवश्यक असलेली फलक अशी सोशल पोलिसिंग होत असताना गुन्हे शाखेतील दोन प्रकारांनी पोलिसांची प्रतिमा काहीअंशी डागाळली आहे. गुन्हेगाराला पाठीशी न घालता त्याचेवर थेट कारवाई करण्याचा दंडक आयुक्तांनी घातला आहे. त्याच पार्श्वभूमिवर आयुक्त गुन्हे शाखेमध्ये कुठला व्यापक फेरबदल करतात, कारवाईची कुऱ्हाड कुणावर कोसळते? याकडे पोलिसांसह अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. टीप प्रकरणात ठोस कारवाई करून ‘गोपाल’काल्याला ब्रेक बसू शकेल, अशी अपेक्षा पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.(प्रतिनिधी)

गुन्हे शाखेत श्रेयाची लढाई

वेगवेगळी पथके असल्याने गुन्हे शाखेतच स्पर्धा वाढली आहे. मात्र ती डिटेक्शनपुरती मर्यादित न राहता ती स्पर्धा अंतर्गत हेवेदावे आणि पोलीस खात्याची प्रतिमा बदनाम करणारी ठरू लागली आहे.प्रशासनाचा दांडगा अनुभव असणाऱ्या आयुक्तांच्या नजरेतून गुन्हे शाखेतील ही बेदिली सुटू शकली नाही. त्यामुळेच त्यांनी टिप प्रकरणामध्ये ‘वेळ’ घेतला असला तरी होणारी कारवाई ही मोठीच असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Web Title: The Commissioner's 'Social Police'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.