मिशन लोकसभा : दारू, ड्रग, कॅश, ऐवज जप्तीवर आयोगाचा वॉच
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: February 28, 2024 09:51 PM2024-02-28T21:51:51+5:302024-02-28T21:53:34+5:30
दोन महिन्यांत झालेल्या कारवायांची मागितली माहिती
अमरावती : लोकसभेची निवडणूक प्रलोभनमुक्त, पारदर्शी वातावरणात व्हावी, यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधीत पोलिस, कस्टम, एक्साईज, जीएसटी, इन्कम टॅक्ससह अंमलबजावणी करणाऱ्या १७ यंत्रणांद्वारा झालेल्या कॅश, मौल्यवान ऐवज, ड्रग, दारू, मोफत वाटप यासारख्या कारवायांचा तपशील जिल्हा निवडणूक विभागाने मागितला आहे.
जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, रोख व मौल्यवान ऐवजासंबंधी आयकर, आरबीआय, एसएलबीसी, एएआय, बीसीएएस, स्टेट सिव्हिल इनफोर्समेंट डायरेक्टोरेट, पोस्ट डॅपार्टमेंट, सीआयएसएफ, दारू संबंधित पोलिस विभाग, राज्य उत्पादक शुल्क, आरपीएफ, ड्रग संदर्भात पोलिस, एनसीबी, आयसीजी व डीआरआय, मोफत वस्तू वाटपासंबंधी सीजीएसटी, एसजीएसटी, स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट यासह अन्य कारवायांसाठी सीआरपीएफ व वनविभाग यासारख्या १७ विभागांकडे दोन महिन्यांत झालेल्या कारवायांची माहिती मागण्यात आलेली आहे. याबाबतचा तपशील प्राप्त होताच तो आयोगाला पाठविण्यात येणार आहे.
निवडणुका प्रक्रिया निर्भय, मुक्त, पारदर्शी व प्रलोभनमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी आयोगाद्वारा सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी व पथकांचे कार्य सुरू होणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.