सातवा वेतन आयोगाच्या निश्चितीसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:13 AM2021-03-27T04:13:30+5:302021-03-27T04:13:30+5:30
अमरावती : महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची ...
अमरावती : महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. आयुक्तांच्या निर्देशानुसार उपायुक्तांनी ही समिती गठित केली आहे.
ही प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी गठित समितीत सेवानिवृत्त लेखाधिकारी अशोक पंचभाई, ग.रा. पिहूळकर, लेखा विभागातील लिपिक बिट्टू डेंड्युले, रितेश व्यास, शरद काळे, सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक उषा उतखडे, आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक राहुल खरे व मयूर जलतारे यांचा या समितीत समावेश आहे. याकरिता बांधकाम विभागाचा कक्ष उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याच ठिकाणी समितीचे कामकाज होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी महापालिका कर्मचारी महासंघाद्वारा करण्यात आलेली आहे. थकबाकीची प्रकरणे मार्च २०२१ पर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन आयुक्तांनी संघटनेला दिले होते. त्यामुळे संघटनेद्वारा आंदोलनाची माघार घेतली होती. मात्र, वेतन आयोगाची थकबाकी जमा करण्यासंर्दभात प्रशासनाच्या कुठल्याच हालचाली नसल्याबाबत संघटनेनी खेद व्यक्त केला. कर्मचाऱ्यात नाराजी असल्याने या भावनेचा कधीही उद्रेक होऊ शकतो, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.