पोलिस आयुक्तालयातील महिला सेलमध्येच घातला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:16+5:302020-12-25T04:12:16+5:30
महिला पोलिसला धक्काबुक्की करून खुर्च्यांची फेकफाक-दोन महिलांसह एक इसमाविरुध्द गुन्हा दाखल अमरावती : आपसी समझौद्याच्या बैठकीकरिता हजर झालेल्या अर्जदार ...
महिला पोलिसला धक्काबुक्की करून खुर्च्यांची फेकफाक-दोन महिलांसह एक इसमाविरुध्द गुन्हा दाखल
अमरावती : आपसी समझौद्याच्या बैठकीकरिता हजर झालेल्या अर्जदार पक्षातील दोन महिलांसह एका इसमाने पोलिस आयुक्तालयातील महिला सहायक कक्षात गोंधळ घालून खुर्च्यांची फेकफाक केली. इतकेच नव्हे तर तेथील महिला पोलिस अमंलदार यांनाही शिविगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार 23 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन महिलांसह समिर खान (सर्व रा. अलीमनगर) यांचेविरुध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.
जोरजोरात ओरडून फसविण्याची धमकी
या घटनेची तक्रार महिला पोलिस उपनिरीक्षर हिरोडे यांनी फ्रेजरपुरा पोलिसात नोंदविली. महिला सेल येथील एका प्रकरणात आपसी बैठकीच्या तारखेवर एका फिर्यादी महिलेसह तीन जण महिला सहायक कक्षात हजर झाले. त्याचप्रमाणे गैरअर्जदार पक्षा सुध्दा हजर झाला होता. महिला पोलिस हवालदार अनिता अर्जदार आणि गैरअर्जदार पक्षासोबत चर्चा करीत असताना, अर्जदार पक्षातील दोन महिलांनी जोरजोरात ओरडून गैरअर्जदारांना आताच अटक करा, असा आग्रह धरून टेबलावरील कागदपत्र्यांची फेकफाक करीत ते फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथील पोलिस अधिकारी व अमंलदारांना शिविगाळ करून त्या महिला तेथून निघून गेल्या. त्यानंतर पीएसआय हिरोडे आपल्या शासकीय कामात असताना, दोन्ही महिला समिर खान नामक इसमासोबत पुन्हा महिला सेलच्या कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी पुन्हा जोरजोरात ओरडून तेथील महिला अमंलदारला कोंबा मारला, तसेच हाताला नखाने ओरबडले. त्यानंतर अश्लिल भाषेत शिविगाळ करून खुर्च्यांची फेकफाक केली.
बॉक्स
तिन्ही आरोपींना अटक
अर्जदार महिलांचा गोंधळ पाहून पोलिसांनी त्या महिलांना आवरण्याचे प्रयत्न सुरु केले. या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना दिली. फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून दोन्ही महिलांसह समिर खानला ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द भादंविच्या कलम 353, 332, 294, 506, 34 नुसार गुन्हा नोंदवून तिघांनाही अटक केली. तिन्ही आरोपींना 24 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले.