संचारले नवचैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:15 PM2018-01-20T23:15:34+5:302018-01-20T23:25:48+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : रेवसानजीक होणाऱ्या श्री गजानन विजय ग्रंथ महापारायणाच्या आदल्या दिवशी शनिवारी अमरावतीत भव्य दिंडी काढण्यात आली. जिल्हा व जिल्हाबाहेरून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. श्री गजानन महाराज यांच्या जयघोषाने अवघी अंबानगरी दुमदुमून गेली.
शहराकरिता शनिवारी सकाळी चैतन्याची पहाट उगवली. महापारायण सोहळ्यापूर्वी दिंडी निघणार असल्याचे मॅसेज सर्वांना रवाना झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक विवेकानंद कॉलनी येथे जमले होते. शहरातील प्रमुख मार्गाने काढलेल्या दिंडीत सुमारे पाच हजारांवर वारकऱ्यांनी सहभाग घेतला. मृदंग, टाळ, चिपड्या, डफ, ढोल यांच्या निनादाने अमरावतीकरांचे लक्ष वेधले होते. दिंडीत हत्ती रथ, गजानन महाराजांच्या मूर्तीचा रथ घेऊन वारकºयांचा जयघोष सुरू होता. लहान मुले व पुरुषांनी पांढरे वस्त्र, तर महिलांनी गुलाबी व पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने दिंडीत वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. काही महिलांनी डोक्यावर तुळस घेतली.
चौकाचौकांत झाली पुष्पवृष्टी
शिस्तबद्ध दिंडीकरी आणि मार्गात स्वच्छतेसाठी सेवेकऱ्यांची चढाओढ हे प्रमुख आकर्षण ठरले. सकाळी ९ वाजता विवेकानंद कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. शहरातील विविध रस्त्यावरून दिंडीचे स्वागत करण्यात आले. पुष्पगुच्छ, फुलांचा वर्षावात दिंडी मार्गस्थ होत होती.
दिंडी रुख्मिणीनगर, राजकमल, शाम चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, पंचवटी चौक, गाडगेनगर, शेगाव नाका, कठोरा नाका, नवसारी मार्गे दिंडी पारायणस्थळी सायंकाळी ५.३० वाजता पोहोचली. दरम्यान दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चहा-पाण्यासह नास्ताची सुर्व सुविधा भाविकांनी केली.
दिंडी मार्गात वारकऱ्यांना पाणी देण्याकरिता स्टॉल लागले होते. तेथे पोहोचून पाणी घेण्याऐवजी त्यांना सोबत असलेले सेवेकरी पाऊच-बॉटल पोहोचवून देत होते. याशिवाय त्यांच्याकडील रिकामे झालेले पाऊच गोळा करीत होते. विशेष म्हणजे, हे रिकामे पाऊच पोत्यात भरून ते दिंडीच्या सर्वांत मागे असलेल्या ट्रॅक्टरमध्ये पोहचविले जात होते. या ट्रॅक्टरच्या सोबतीने झाडू घेऊन असलेला युवकांचा गट मार्गात उर्वरित कचरा आणि रांगोळीवर टाकलेल्या फुलांचे निर्माल्य गोळा करण्याची काळजी घेत होता.
‘लोकमत’तर्फे भाविकांना पाण्याचे वितरण
दिंडी इर्विन चौकाकडून मोर्शी मार्गावर आल्यावर लोकमत युनिट कार्यालयासमोर दिंडीचे स्वागत करण्यात आले. पाणीपाऊचचे वितरण करून वारकºयांची तृष्णातृप्ती केली.
राजकमल चौकात स्वागत
राजकमल चौकात नवयुवक क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीवर पुष्पवर्षाव केला. दिंडीकºयांना पाणीपाऊच, चहा-नास्तासह फराळाचे वाटप केले.
पालखी मार्गावर गर्दी
दिंडी मार्गस्थ होत असताना तिचे भाविकांनी चौकाचौकात स्वागत केले. श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.
स्वच्छतेसाठी सेवेकऱ्यांची चढाओढ
दिंडीत आयोजन समितीतर्फे स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले होते. पाणीपाऊच व नास्ता प्लेट गोळा करण्यासाठी सेवेकऱ्यांची चढाओढ दिसून आली. व्यावसायिक व उच्चपदस्थ अधिकारीही यामध्ये होते. ते रस्त्यावर पडलेले पाऊच व नास्ता प्लेट उचलून पोत्यात गोळा करीत होते.
३० हजारांवर भाविकांची नोंद
रविवारी होणाऱ्या महापारायणाचा उत्साह शनिवारच्या दिंडी सोहळ्याने द्विगुणित केला. महापारायणात ३० हजार भाविक सकाळी ७.२० पासून एकाच वेळी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणार आहेत.
१८ दिंड्यांचा सहभाग
दिंडी सोहळ्यामध्ये एकूण १८ दिंड्यांचा सहभाग होता. प्रत्येक दिंडीच्या पुढे वाहनावर ध्वनिक्षेपकाची सोय करण्यात आली होती. दिंडीकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.