वाघाच्या सुरक्षिततेसाठी गावकऱ्यांसोबत संवाद
By admin | Published: February 3, 2017 12:19 AM2017-02-03T00:19:36+5:302017-02-03T00:19:36+5:30
नजीकच्या पोहरा, चिरोडी राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे वाघाच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण जबाबदारी
उपवनसंरक्षकांचा पुढाकार : पोहरा, चिरोडी जंगलात ‘नवाब’चे अस्तित्व
अमरावती : नजीकच्या पोहरा, चिरोडी राखीव जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. त्यामुळे वाघाच्या सुरक्षिततेची महत्त्वपूर्ण जबाबदारी गावकऱ्यांवरही सोपविण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्याअनुषंगाने बुधवारी उपवनसंरक्षकांनी जंगल शेजारील गावकऱ्यांसोबत संवाद साधून वाघाचे अस्तित्व आणि गावकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्यात.
पोहरा, चिरोडी, मालखेडच्या राखीव जंगलात वाघ, बिबट, मोर, हरिण आदी वन्यप्राणी, पशुंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी हे जंगल नष्ट होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. वनविभागाने हे जंगल समृद्ध करण्यासाठी जीवाचे रान केले. परिणामी आता वाघाच्या अस्तित्वाने पोहरा, चिरोडी जंगल राज्याच्या नकाशावर झळकत आहे. आता या जंगलाची समृद्धी कायम ठेवताना पाहुणा म्हणून आलेल्या नवाब नामक वाघाच्या सुरक्षिततेची मोठी जबाबदारी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्याकडे आली आहे. परिणामी वने आणि वन्यप्राण्यांवर प्रेम करणाऱ्या गावकऱ्यांसोबत थेट संवाद साधण्यासाठी आयएफएस असलेले उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी पुढाकार घेतला आहे. पोहरा, चिरोडी, कारला, इंदला, कस्तुरा, हातला, बोडणा, पिंपळखुटा, परसोडा, भानखेडा, दिवाणखेडा, घातखेडा ही गावे जंगलावर निर्भर आहेत. इंधन, चारा, पाणी, तेंदू या गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांना पर्याय नाही. पोहरा, चिरोडीत असलेल्या वाघ, बिबट अन्य वन्यप्राण्यांचे संरक्षण तसेच जंगलाचे संवर्धन करण्यासाठी गावकऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी वनविभाग सरसावला आहे. या गावांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे बळकटीकरण करताना गावात प्रत्येक कुटुंबीयांना घरगुती गॅस सिलिंडर वाटप, चारा तयार करण्यासाठी साहित्य व निसर्ग पर्यटन बाबीवर भर दिला जात आहे. त्याकरिता गावागावांत बैठकी घेऊन उपवनसंरक्षक मीणा हे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत. वने, वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पोहरा येथील गावकऱ्यांसोबत संवाद साधताना हेमंत मीणा यांनी जंगलात वाघ असल्याचे स्पष्ट केले. गावकऱ्यांनादेखील आता जंगलात भीती वाटत आहे. हे जंगल बहरले असून गुरे चराईसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून ते त्वरेने सोडवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. बैठकीला सरपंच वनिता राऊत, वनपरिक्षेत्राधिकारी अनंत गावंडे, वनपाल विनोद कोहळे, वन्यजीवप्रेमी यादव तरटे, माजी सरपंच सुभाष राठोड, पोलीस पाटील पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)