नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच दिवसात रक्कम जमा होणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
By गणेश वासनिक | Published: September 1, 2022 03:57 PM2022-09-01T15:57:28+5:302022-09-01T16:09:08+5:30
शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत पंचनामे अंतिम टप्प्यात
धारणी (अमरावती) : राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी आलो आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसात रक्कम त्यांच्या खात्यात टाकली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी मेळघाट दौऱ्यात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत गुरुवारी पहिल्या दिवशी राज्याचे कृषिमंत्र्यांनी धारणी तालुक्यातील साद्राबाडी या गावात एक दिवसापूर्वी येऊन आदिवासी शेतकरी शैलेंद्र सावलकर यांच्या घरी बुधवारी रात्री मुक्काम केला. त्यांच्या घरी अस्सल गावरान भोजनाचा आस्वाद घेतला.
गुरुवारी सकाळपासून त्यांनी धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, पाथरपूर या भागातील शेतीची पाहणी केली. त्यानंतर सुभाष रामलाल पटेल यांचे शेतात दुपारी दुपारचे जेवण घेतले. यानंतर त्यांनी लाकटू गावाकडे मोर्चा वळविला आणि विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केलेला युवा शेतकरी अनिल सूरजलाल ठाकरे (२५) यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शेतकऱ्यांची व्यथा पाहून डोके सुन्न झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी दिली. कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर व विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते.