विभागीय वनअधिकाऱ्याविरुद्ध सहायक वनसंरक्षकाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 06:46 PM2019-05-16T18:46:27+5:302019-05-16T18:46:30+5:30
पाकीट प्रकरणाला वेगळे वळण : मोबाइलचे सीडीआरसह सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
अनिल कडू/परतवाडा (अमरावती) : विभागीय वनअधिकाऱ्याविरुद्ध सहायक वनसंरक्षकांनी मुख्य वनसंरक्षकांकडे तक्रार केल्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. यात पाकीट प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, विभागीय वनअधिकाऱ्याच्या मोबाइलचे सीडीआर मागविण्यासह सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी सहायक वनसंरक्षकांनी केली आहे.
विभागीय वनअधिकारी (योजना) सैफन शेख यांच्याविरुद्ध मेळघाट प्रादेशिक वनविभाग (परतवाडा) अंतर्गत धारणी येथील सहायक वनसंरक्षक एस.एस. कोलनकर यांनी ही तक्रार मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती यांच्याकडे केली आहे.
विभागीय वनअधिकारी सैफन शेख वनविभागातील कामांकरिता संबंधित अधिकाºयांना अनुदान (निधी) वितरित करतात. विविध कामांच्या अनुषंगाने वितरित केलेल्या शासकीय अनुदानात त्यांना आपला हिस्सा (वाटा) हवा आहे. मार्च एन्डचा वाटा, पाकीट मिळाले नाही म्हणून ते आरएफओंना भेटायला बोलावतात. यात सहायक वनसंरक्षकांनाही सहकार्य करायला लावतात. ते भ्रष्टाचार करण्यास प्रवृत्त करतात. ते भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे आहेत, असे एस.एस. कोलनकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
सहायक वनसंरक्षक एस.एस. कोलनकर यांनी आपली ही तीन पानांची तक्रार १६ दिवसांपूर्वी धारणी स्थित स्वत:च्या कार्यालयातून सवस/धारणी/१६/२०१९-२० अन्वये मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्याकडे पाठविली आहे. यात त्यांनी २६ एप्रिल आणि ३० एप्रिल २०१९ या दोन दिवसांत घटनांचा घडलेल्या प्रकाराचा ऊहापोह केला आहे, तर घडलेला प्रकार त्याच दिवशी भ्रमणध्वनीवरून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या कानावरही त्यांनी टाकला आहे.
असंवैधानिक कृत्य/असभ्य भाषा
विभागीय वनअधिकारी शेख यांनी ३० एप्रिलला स्वत: केबिनमध्ये बोलावून माझ्या दिशेने टेबलपर एक पाकीट फेकले. तुम्ही आणि तुमचे आरएफओ भिकारचोट आहेत. तुमच्याकडून मला काहीही मिळाले नाही. पण, मीच माझ्याकडून तुम्हाला मार्च एन्डचे पैशाचे पाकीट देत आहे, अशी भाषा वापरून माझा व माझ्या अधिनस्त असलेल्या आरएफओंचा अपमान केल्याचे कोलनकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
मोबाइल सीडीआर
विभागीय वनअधिकारी सैफन शेख यांच्यासह स्वत:चा मोबाइल नंबर देत या मोबाइलचा सीडीआर मागवण्यात यावा. एकूण ५ मिनिटे २६ सेकंद झालेल्या संभाषणात शेख काय बोलले, याचाही उल्लेख कोलनकर यांनी तक्रारीत केला आहे. या सीडीआरसह सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याची मागणीही कोलनकर यांनी केली आहे. या तक्रारीची प्रत त्यांनी उपवनसंरक्षक (मेळघाट प्रादेशिक वनविभाग, परतवाडा) यांनाही दिली आहे.
तक्रार अधिकृतपणे माझ्याकडे आलेली नाही. तक्रारीत नमूद प्रकार घडलेला नाही. कुठलेही असंवैधानिक कृत्य, असभ्य भाषा मी वापरलेली नाही. स्वत:च्या बचावाकरिता खोटे आरोप त्यांनी केले असावेत. प्रशासकीय वातावरण गढूळ करण्याचा हा प्रयत्न आहे.
- सैफन शेख, विभागीय वनअधिकारी (योजना), अमरावती