शिक्षण सहायक संचालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार, नियमबाह्य घरभाडे वसुलीचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 08:43 PM2019-03-04T20:43:21+5:302019-03-04T20:43:39+5:30
शासनाच्या विविध विश्रामगृहात वास्तव करून ते फसवणूक करीत असल्याची तक्रार सोमवारी गाडगेनगर पोलिसात प्राचार्य आर.डी.सिकची यांनी दिली आहे. सहसंचालक विरूद्ध प्राचार्य फोरम हा वाद आता शिगेला पोहचला आहे.
अमरावती : येथील उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे हे १० महिन्यांपासून घरभाडे भत्त्याची उचल करीत आहे. दुसरीकडे शासनाच्या विविध विश्रामगृहात वास्तव करून ते फसवणूक करीत असल्याची तक्रार सोमवारी गाडगेनगर पोलिसात प्राचार्य आर.डी.सिकची यांनी दिली आहे. सहसंचालक विरूद्ध प्राचार्य फोरम हा वाद आता शिगेला पोहचला आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील केळकर वाडीस्थित रहिवासी आर.डी. सिकची यांनी सोमवारी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक कळंबे यांनी १४ एप्रिल २०१८ रोजी उच्च शिक्षण सहसंचालक पदाचा कारभार स्वीकारला. रूजू झाल्यापासून कळंबे हे शासनाच्या विविध विश्रामगृहात अनधिकृतपणे आणि विनाशुल्क वास्तव करीत आहे. असे असताना ते तब्बल १० महिन्यांपासून शासनाकडून घरभाडे भत्तासुद्धा घेत आहेत. एकीकडे घरभाडे भत्ता घेणे आणि दुसरीकडे गाडगेनगर स्थित शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालय व अमरावती विद्यापीठाच्या विश्रामगृहात विनाशुल्क मुक्काम ठोकणे हा सर्व प्रकार नियमबाह्य असल्याचे प्राचार्य सिकची यांनी तक्रारीत नमूद केले आहे. शासनाकडून घरभाडे भत्ता घेऊन दुसरीकडे शासकीय जागेत विनाशुल्क राहणे ही बाब शासनाची शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाºयांवर भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करून शासनाची होणारी फसवणूक थांबवावी, अशी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. गाडगेनगर पोलीस कारवाई करणार काय, याकडे शिक्षण क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.
सहविचारी सभेनंतर कळंबे यांच्याविरुद्ध रोष वाढला
येथील उच्च व तंत्र शिक्षण संचालकांच्या पुढाकाराने २ मार्च रोजी अमरावती विभागातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची सहविचारी सभा घेण्यात आली. या सभेत सहसंचालक अशोक कळंबे यांच्या कारभारावर बोट ठेवत त्यांना 'टार्गेट' करण्यात आले. कर्मचाºयांच्या सेवापुस्तिका गहाळ होण्याबाबत कळंबे यांच्यावर रोष व्यक्त करण्यात आला.
होस्टेलच्या नियमानुसार विश्रामगृहात वास्तव्य आहे. शुल्क अदा केल्याच्या पावत्यादेखील माझ्याकडे आहे. मी काहीही नियमबाह्य केले नाही. सिकची यांचे आरोप वैयक्तिक कामे पूर्ण करण्यासाठीची धडपड आहे. मात्र, मी कोणतेही नियमबाह्य कामे करणार नाही अथवा करू देणार नाही.
- अशोक कळंबे,
सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण, अमरावती