शिक्षणमंत्र्यांविरुद्ध अमरावतीतील ‘त्या’ विद्यार्थ्यांची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 09:53 PM2019-01-17T21:53:53+5:302019-01-17T21:55:39+5:30

विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी तक्रार युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड या विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिली.

Complaint against the education minister in Amravati | शिक्षणमंत्र्यांविरुद्ध अमरावतीतील ‘त्या’ विद्यार्थ्यांची पोलिसांत तक्रार

शिक्षणमंत्र्यांविरुद्ध अमरावतीतील ‘त्या’ विद्यार्थ्यांची पोलिसांत तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्देपुन्हा तापणार मुद्दाअखेरपर्यंत लढण्याचा निर्धार

गणेश देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी तक्रार युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड या विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर हा मुद्दा पुन्हा तापण्याचे संकेत आहेत.
युवराज आणि प्रशांत हे अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला ते शिकत आहेत. महाविद्यालयीन कार्यक्रमादरम्यान ना. तावडे यांना मोफत उच्चशिक्षण लागू करण्याबाबत प्रशांत राठोड याने प्रश्न विचारला. तो न रुचल्यामुळे ना. तावडे यांनी प्रशांतला नोकरी करण्याचा सल्ला दिला. चित्रीकरण थांबविण्याचा आदेश देऊनही थांबविणार नाही, असे बाणेदार उत्तर दिल्यामुळे युवराजला अटक करण्याचे आदेश दिले गेले. पोलिसांनी युवराजला महाविद्यालय परिसरातच ताब्यात घेतले. नंतर पोलीस वाहनात बसवून नेले. यादरम्यान प्रशांतलादेखील काही पोलिसांनी पकडून ठेवले. युवराजचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. युवराजच्या अनुमतीशिवाय त्यातील ती महत्त्वपूर्ण चित्रफीत डिलीट केली. या संपूर्ण घटनेची तक्रार विद्यार्थ्यांनी यापूर्वीही पोलीस आयुक्तांकडे केली आहे. ‘लोकमत’ने यासंबंधी वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केल्यानंतर देशभरातील माध्यमांनी ते उचलून धरले, हे येथे उल्लेखनीय.

या कारणांसाठी करा गुन्हे दाखल!
विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश देणे, दमदाटी करणे, मंत्र्यांनी अधिकाराचा गैरवापर करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे, बेकायदेशीररीत्या मोबाइल घेणे, परवानगीशिवाय त्यातील मजकूर डिलीट करणे, मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांबाबत खोटे विधान करणे, त्यामुळे मानसिक त्रास आणि सामाजिक रोषाला बळी पडावे लागणे, शैक्षणिक व आर्थिक नुकसान झेलावे लागणे या कारणांसाठी शिक्षणमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असा आशय तक्रारीचा आहे. दरम्यान, तक्रार प्राप्त झाली आहे, चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिवाला धोका; पण लढणारच!
आम्ही सराईत गुन्हेगार नाहीत, विद्यार्थी आहोत. पोलीस आयुक्तांना यापूर्वी तक्रार दिली. संस्थाध्यक्षांचीही भेट घेतली. त्यांनी काहीच केले नाही. आमच्यावर पाळत ठेवली जात आहे. धमक्या दिल्या जात आहेत. जीविताला धोका निर्माण झाला आहे. सत्तेविरुद्ध न्याय मागणे हे वाळूतून तेल काढण्याइतपत कठीण असल्याची प्रचिती आली आहे. तरीही अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे, अशी प्रतिक्रिया युवराज आणि प्रशांत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Complaint against the education minister in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.