पुसनेरच्या ग्रामस्थांकडून ग्रामसेवकाविरुद्ध तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:11 AM2021-05-24T04:11:55+5:302021-05-24T04:11:55+5:30
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच महिन्यापासून येथे रुजू झालेल्या ग्रामसेवकांना गावाच्या कामकाजाचे दिवस ठरवून दिले असताना, त्याबाबतची माहिती सरपंचांना त्यांनी ...
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच महिन्यापासून येथे रुजू झालेल्या ग्रामसेवकांना गावाच्या कामकाजाचे दिवस ठरवून दिले असताना, त्याबाबतची माहिती सरपंचांना त्यांनी दिली नाही. घरकुलाचे मोजमाप करणे तांत्रिक अधिकारी म्हणून त्यांच्या अधिकारकक्षेत येत नसतानाही ग्रामसेवक स्वतः घरकुलाचे मोजमाप करून लाभार्थींना अडचणीत आणत आहेत. मीटिंगची सबब दाखवून दिलेल्या दिवसाला गैरहजर राहतात. ग्रामपंचायत रेकॉर्डचे ताबेदार सरपंच असताना सचिव रेकॉर्ड सोबत घेऊन जातात. मीटिंग रजिस्टरवर घेतलेले अनेक महत्त्वाचे ठराव ऐनवेळी काढण्यास विविध कारणे सांगतात, असेही तक्रारीत नमूद आहे. गावाच्या विकासासाठी तसेच कर वसुलीसाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांना विश्वासात न घेतल्याने कर वसुलीचे काम रखडले आहे. नागरिकांना वेळोवेळी लागणारे ग्रामपंचायतीचे दाखले मिळण्यासाठी विलंब लागतो. ग्रामपंचायतचे १ ते ३३ नमुने अद्ययावत नाहीत.
बोरगाव भुसारी येथील सोलर पंप अडीच महिन्यांपासून बंद आहे. त्याच्या दुरुस्तीकरिता ग्रामसेवकाने वरिष्ठाकडे पाठपुरावा केला नाही. ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा दोन महिन्यापासून खंडित आहे. याबाबतची तक्रार सरपंच मदन काजे, उपसरपंच प्रफुल खडसे, संदीप काजे, सुधाकर काजे, गजानन काजे, योगिता काजे, बबीता हेरोडे, संगीता अघम, विनोद काजे, पुरुषोत्तम काजे, सतीश काजे, नीलेश काजे, रवींद्र काजे व ग्रामस्थांनी केली आहे.