अमरावती विद्यापीठातील पेपरफूटी प्रकरणी तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 05:22 PM2019-06-09T17:22:21+5:302019-06-09T17:28:45+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी मॅकेनिक्स या विषयाच्या पेपर फूटीप्रकरणी शनिवारी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी मॅकेनिक्स या विषयाच्या पेपर फूटीप्रकरणी शनिवारी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे याप्रकरणी कोण दोषी आहेत, हे पोलीस तपासातून पुढे येणार आहे.
विद्यापीठातून परीक्षा केंद्रावर ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठविताना त्या ‘लीक’ झाल्याची बाब 29 मे रोजी सारणी कक्षाच्या लक्षात आली. त्यानंतर याप्रकरणी विद्यापीठाने आपल्या स्तरावर शोध घेतला. अभियांत्रिकी मॅकेनिक्स या विषयाच्या पेपरफूटप्रकरणी वाशिम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचा कर्मचारी ज्ञानेश्वर बोरे हा मुख्य मास्टरमाईंड असल्याचे विद्यापीठाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान लक्षात आले. तब्बल 45 मिनिटांपूर्वी पाठविलेली प्रश्नपत्रिका बोरे यांनीच 'डाऊनलोड' करून ती पुन्हा विद्यापीठातील अस्थायी कर्मचारी आशिष राऊत यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवर पाठवली गेली. हा सर्व प्रकार शोधून काढण्यात विद्यापीठाला 4 ते 5 दिवस लागले.
परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी सातत्याने याप्रकरणाचा पाठलाग केला. काही बाबी प्राथमिक चौकशी दरम्यान कागदावर आणल्या. आशिष राऊत, ज्ञानेश्वर बोरे यांचे कबुली बयाण नोंदविण्यात आले. पेपरफूटीप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू असताना पडद्यामागे कुलगुरू मुरलीधर चांदेकर हे लक्ष ठेवून होते. त्यामुळे 4 जून रोजी सिनेट सभेत संतोष ठाकरे यांनी हे प्रकरण लक्षवेधी म्हणून मांडताच प्रशासनाने सुद्धा तितक्याच ताकदीने विद्यापीठाची बाजू मांडली. सिनेट सदस्यांनी काही वेळा याप्रकरणी विद्यापीठाची कोंडी करण्याचे प्रयत्न चालविले. मात्र ‘करे नही तो डर काहे का’ अशी रोखठोक भूमिका विद्यापीठाने घेतली.
दरम्यान सिनेटमध्ये सांगोपांग चर्चा झाल्यानंतर पेपरफूट प्रकरण पोलिसात देण्याचा निर्णय झाला. दरम्यान अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, परीक्षा संचालक हेमंत देशमुख, प्राचार्य ए.बी. मराठे या त्रिसदस्यीय समितीकडे याप्रकरणी चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याअनुषंगाने या समितीने दोन दिवसांतच चौकशी पूर्ण केली. 7 जून रोजी कुलगुरू चांदेकर यांना अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी शनिवार, 8 जून रोजी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. आता याप्रकरणी पोलीस चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे पेपरफूटप्रकरणी कोणते मोठे मासे गळाला लागेल, याकडे नजरा लागल्या आहेत.
फ्रेजरपुरा पोलिसांत शनिवार, 8 जून रोजी तक्रार नोंदविली आहे. चौकशी समितीच्या अहवालाचा आधार घेण्यात आला आहे. विद्यापीठाकडून एकूणच पारदर्शकता बाळगली आहे. जे कोणी यात दोषी असतील त्यांच्याविरूद्ध पोलिसांकरवी कठोर कारवाई अपेक्षित आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ
खासगी कोचिंग क्लासेस रडारवर
पेपरफूटीप्रकरणी शहरातील काही खासगी कोचिंग क्लासेस संचालकांचे लागेबांधे असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. त्यामुळे यात कोणत्या खासगी कोचिंग क्लासेस सहभागी आहेत, हे पोलीस चौकशी दरम्यान समोर येण्याची दाट शक्यता आहे. अभियांत्रिकी मॅकेनिक्स विषयांसह आतापर्यंत कोणत्या विषयाचे पेपर ‘लीक’ झाले, हे पोलीस शोधून काढतील.