मुलगी झाली तर जाळून मारेन; पत्नीचा छळ, तलाक देण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 05:38 PM2022-03-30T17:38:37+5:302022-03-30T17:52:01+5:30
विवाहिता गर्भवती असताना पहिल्या प्रसूतीचा खर्च माहेरकडे असल्याचे तिला बजावण्यात आले. त्यासाठी १० हजार रुपये आणण्याचा तगादादेखील तिला लावण्यात आला.
अमरावती : मुलगी झाली तर जाळून मारेन, मुलगा झाला तर माहेरी पाठवेन, अशी धमकी देत एका विवाहितेला मारहाण करण्यात आली. आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने तलाक देण्याचीदेखील धमकी दिल्याचे विवाहितेने परतवाडा पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी २८ मार्च रोजी आसीफखान सिकंदरखान व एक महिला (दोघेही रा. गटरमलपुरा, परतवाडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहिता अचलपुरात एकत्र कुटुंबात नांदत असताना व गर्भवती असताना पहिल्या प्रसूतीचा खर्च माहेरकडे असल्याचे तिला बजावण्यात आले. त्यासाठी १० हजार रुपये आणण्याचा तगादादेखील तिला लावण्यात आला. मुलगी झाली तर जाळून मारेन, मुलगा झाला तरच माहेरी पाठवेन, अशी धमकीदेखील देण्यात आली.
१५ दिवसांआधी विवाहितेला मुलगा झाला. त्यामुळे माहेरी नेण्यासाठी तिचा भाऊ अचलपुरात आला असता, तिलाच शिवीगाळ करण्यात आली. पती व एका महिलेने आपला शारीरिक व मानसिक छळ केला. शिवीगाळ करून तलाक देण्याची धमकी देण्यात आली, याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे प्रकरण समुपदेशन केंद्राकडे पाठविण्यात आले. मात्र, तेथे विवाहिता व तिच्या पतीमध्ये समेट घडून आला नाही. त्यामुळे ते प्रकरण पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.