‘डॉट कॉम’प्रकरणी कुलगुरू, प्र-कुलगुरूंविरुद्ध पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:34+5:302021-05-29T04:11:34+5:30
७२ लाखांच्या बेकायदेशीर निविदा प्रकरण तापणार, दिनेश सूर्यवंशीचे फेसबूक लाईव्ह बंद पाडल्याचा आरोप अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ...
७२ लाखांच्या बेकायदेशीर निविदा प्रकरण तापणार, दिनेश सूर्यवंशीचे फेसबूक लाईव्ह बंद पाडल्याचा आरोप
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध विभागांचे कामकाज ऑनलाईन होण्यासाठी डॉट कॉम इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडला ७२ लाखांचे दिलेले कंत्राट बेकायदेशीर आहे. यात कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी केली.
फ्रेजरपुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, कुलगुरू, प्र-कुलगुरूंनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४ (७) चा दुरुपयोग करून डॉट कॉम या मर्जीतील कंपनीला ७२ लाखांचे बेकायदेशीर कंत्राट दिले आहे. १७ नोव्हेंबर २०१६ रोजी अमरावती विद्यापीठाचे वेब बेस्ड इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी सिस्टीम ही संगणकीय प्रणाली विद्यापीठाच्या विविध प्रशासकीय शैक्षणिक व संलग्न महाविद्यालयांशी एकीकृत करण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र, डॉट कॉम ही कंपनी अटी-शर्ती पूर्ण करीत नसल्याचे बघताच मौखिकरीत्या त्या शिथिल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार ५ जानेवारी २०१६ रोजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४ (७) चा वापर करून बदलला आहे. मूळ अटी-शर्तींना बगल देण्यात आली असून, डॉट कॉम या कंपनीला सोयीच्या ठरतील, अशा अटी टाकण्यात आल्या आहेत. यातून मर्जीतील व्यक्तीला आर्थिक लाभ देण्यात आल्याचे तक्रारी म्हटले आहे.
------------
विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरूंविरुद्ध तक्रार प्राप्त झाली आहे. ही तक्रार चाैकशीत ठेवण्यात आली असून, तक्रारकर्त्यांकडून या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे मागविली जाईल. त्यानंतर चौकशी करण्यात येईल.
- पुंडलिक मेश्राम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा
---------------
पोलिसांतील तक्रारीबाबत काही माहिती नाही. डॉट कॉमचा विषय कधीचाच संपला आहे. यात नियमबाह्य काहीच झाले नाही. तक्रारकर्त्यांना केवळ प्रसिद्धी आणि विद्यापीठाची बदनामी करणे एवढेच काम आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
डॉट कॉम प्रकरणी शुक्रवारी फेसबूक लाईव्ह घेणार होतो. मात्र, अचानक बंद पडले. याबाबत माहिती घेतली असता, तक्रारी झाल्यामुळे नेहमी वापरले जाणारे फेसबूक बंद पाडले. स्वतंत्र फेसबूकवरून लाईव्ह करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे.
- दिनेश सूर्यवंशी, माजी सदस्य, व्यवस्थापन परिषद