संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थिनीची तक्रार; अमरावती विद्यापीठात विभागप्रमुखाचा कारभार काढला
By गणेश वासनिक | Published: April 1, 2023 02:51 PM2023-04-01T14:51:49+5:302023-04-01T14:52:08+5:30
विद्यापीठात विद्यार्थिनीचे मानसिक, आर्थिक शोषण प्रकरण; सात दिवसात खुलासा सादर करण्याचे निर्देश
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पीएच.डी.च्या विद्यार्थिनीचे मानसिक, आर्थिक शोषण केल्याप्रकरणी एका विभागप्रमुखांकडून त्यांचा कारभार काढण्यात आला आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. सात दिवसात संबंधित विभागप्रमुखांना खुलासा मागण्यात आला असून, त्यानंतर चौकशी समिती गठित करण्यात येणार आहे.
संशोधन कार्य करणाऱ्या एका विद्यार्थिनीचे ‘त्या’ विभागप्रमुखांकडून मानसिक, आर्थिक शोषण करण्यात आल्याची तक्रार
प्रशासनाकडे करण्यात आली आहे. ही तक्रार निनावी असली तरी कुलसचिवांकडे या प्रकरणाची जबाबदारी सोपविल्याची माहिती आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, १ सप्टेंबर २०२० रोजी पीएच.डी. साठी नोंदणी केली होती. प्रयोगशाळेत तिचे संशोधन कार्य सुरू होते. ‘ऑप्टीकल बायोंसेंसर’ हा तिचा विषय आहे. मात्र या विभागात ‘भौतिक’ सोयीसुविधांची रेलचेल असताना सुद्धा संबंधित विभागप्रमुखांनी मानसिक त्रास दिला. शैक्षणिक कारण नसताना सुद्धा बाहेर ठिकाणी फिरायला येण्यासाठी त्याने अनेकदा तिच्यावर दबाव आणला.
प्रयोगशाळेत उपयोगातील वस्तू, साहित्य विकत आणण्यासाठी त्रास देण्यात आला, असे नमूद आहे. अप्रत्यक्षरीता विभाग प्रमुखांनी पैशाची मागणी देखील केली. दरम्यान २२ ऑक्टोबर २०२२ रोजी कुणीतरी या विभागप्रुखांची निनावी तक्रारी केली. या तक्रारीशी काहीही संबध नसताना सदर विद्यार्थिनींवर शंका घेऊन त्याने मानसिक छळ सुरू केला. संशोधनावर नकारात्मक शेरा लिहू, अशी धमकी त्याने दिली. तुझी पीएच.डी. होऊ देणार नाही. प्रयोगशाळेत काम करू देणार नाही, असे मार्गदर्शक आणि विभागप्रमुखांनी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर चार महिन्यांपासृून प्रयोगशाळेत संशोधन कार्य करण्यास बंदी घालण्यात आली. शैक्षणिक भवितव्य धोक्यात आल्याने वरिष्ठांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय प्रदान करावा, अशी मागणी या विद्यार्थिनीने कुलगुरुंसह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, अमरावती विभागाचे सह संचालकांकडे तक्रार दिली आहे.
विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या अनुषंगाने कुलगुरूंच्या आदेशानुसार ‘त्या’ विभागप्रमुखांचा कारभार काढण्यात आला आहे. संबंधितांचा खुलासा आल्यानंतर चौकशी सुरू केली जाणार आहे. त्याकरिता समिती गठीत करण्यात येईल. - डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.