आमदारांच्या मुंबई जनता दरबारात तक्रारींचा पाऊस
By admin | Published: April 23, 2016 12:01 AM2016-04-23T00:01:55+5:302016-04-23T00:01:55+5:30
आ. बच्चू कडू यांनी मुंबईस्थित मनोरा आमदार निवासात आयोजित केलेल्या जनता दरबाराला राज्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
५०० तक्रारींचा निपटारा : महिनाभरात समस्या सोडवा अन्यथा आंदोलन
चांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी मुंबईस्थित मनोरा आमदार निवासात आयोजित केलेल्या जनता दरबाराला राज्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या जनता दरबारात मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात.
यापैकी ५०० तक्रारींचा निपटारा आ. बच्चू कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून ‘आॅन दी स्पॉट केला’. उर्वरित प्रलंबित तक्रारींचा निर्णय महिनाभराच्या आत घ्या, अन्यथा मंत्रालयात पुन्हा आंदोलन करण्याचाखणखणीत इशारा प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिला.
या सर्व समस्यांचे लेखी निवेदन प्रहार संघटनेच्यावतीने आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन जनतेकडून वसूल केला जाणाऱ्या करातून होते. मात्र, याची जाणीव त्यांना नसल्याने ते मंत्रालयाचे मालक असल्यासारखे वागू लागतात. महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा असून यानुसार आठवड्याच्या आत तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे. परंतु मंत्रालयातील अधिकारी दाखल झालेल्या कोणत्याच अर्जाची वर्षानुवर्षे दखलच घेत नाहीत. यापुढे असे झाल्यास मंत्रालयातील त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीचा लिलाव करून गोळा झालेला पैसा शासकीय तिजोरीत जमा करण्याचा इशाराही याप्रसंगी प्रहारकडून देण्यात आला आहे. जनता दरबारात राज्यभरातून स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अपंग महिला, तरुण, विद्यार्थी, वकील, शेतकरी, शासकीय कर्मचारी, विधवा व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, शिवरत्न शेटे, नीलेश ओझा, जनविकास प्रबोधिनीचे संतोष गवस, जनता दल मुंबईच्या अध्यक्ष ज्योती बेडेकर, सिटीजन फोरम, प्राध्यापक संघटना, माहिती अधिकार कायदा संरक्षक इत्यादी समाजसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी)
बच्चू कडूंचा मंत्रालयाच्या दारावरच ठिय्या
जनता दरबारात प्राप्त झालेली शेकडो प्रकरणे घेऊन आमदार बच्चू कडू मंत्रालयात निघाले असता त्यांना पोलिसांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अडविले. आमदारांसोबत फक्त एकाच व्यक्तिला आत सोडण्याचे आदेश असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. यावर बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या दारातच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच पोलीस यंत्रणा हादरली व त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसह आमदारांनाही आत सोडले. मुख्य सचिवांकडे शुक्रवारी दाखल झालेली सर्व प्रकरणे अधिकाऱ्यांकडे सोपवून या प्रकरणांची दखल घ्या अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, असा इशारा मुख्य सचिवांना देण्यास आ. बच्चू कडू विसरले नाहीत.