आरोग्य देखरेख समितीच्या सभेत तक्रारींचा पाऊस
By admin | Published: March 26, 2016 12:04 AM2016-03-26T00:04:09+5:302016-03-26T00:04:09+5:30
अपेक्षा होमिओ सोसायटीअंतर्गत स्थानिक आरोग्य देखरेख अभियानाच्यावतीने शुक्रवारी जनसंवाद सभेचे आयोेजन ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले होते.
नाराजी : वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती
चांदूररेल्वे : अपेक्षा होमिओ सोसायटीअंतर्गत स्थानिक आरोग्य देखरेख अभियानाच्यावतीने शुक्रवारी जनसंवाद सभेचे आयोेजन ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले होते. या सभेत शेकडो महिला आपापल्या गावांतील तक्रारी घेऊन उपस्थित होत्या. मात्र, सभेला तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य विभागाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याने उपस्थितांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
या सभेत संस्थेचे संचालक मधुकर गुंबळे, सभापती किशोर झाडे, सदस्य सतीश देशमुख, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक मरसकोल्हे, प्रवर्जा महाजन, प्रभाकर भगोले, युसुफ खाँ पठाण, अभिजित तिवारी, काळे, मनू वरठी, उपसरपंच मीना निहाटकर, सदस्य भीमराव करवाडे आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागातील कुपोषित बालके, गरोदर महिलांचे संगोपन, अंगणवाडी पोषण आहाराबद्दल ग्रामीण भागाचे वास्तव आणि कर्मचाऱ्यांची स्थिती याबाबत कागदोपत्री माहिती घेऊन वरिष्ठांकडे पाठविण्याचा या बैठकीचा शिरस्ता आहे. महिलांनी या बैठकीत अनेक तक्रारी आणल्या होत्या.
वाई बागापूर येथील मीरा उके यांनी तक्रार विशद करताना येथील गरोदर महिलांची तपासणी करून लसीकरण होत नाही, दोन महिन्यांपासून कर्मचारी फिरकले नाहीत, असे सांगितले तर रेखा धावडे यांनी नेत्रशल्याबाबत तक्रार केली. आरोग्य यंत्रणेचा ग्रामीण भागातील गावखेडयातील नागरिकांना लाभ होतो की नाही, हे पाहण्यासाठी आरोग्य देखरेख समिती कार्यरत आहे. मात्र, या सभेत वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याने सभेतील तक्रारी संबंधितांकडे सोपविण्यात याव्यात, असे गुंबळे यांनी सुचविले. या बैठकीला वरिष्ठ आरोेग्य अधिकारी अनुपस्थित असल्याने उपिस्थतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ औपचारिकतेसाठी सभेचे आयोजन होते काय? समस्या सोेड्विण्याची मागणीही केली, असा सवाल करण्यात आला. संचालन सोमेश्वर तर आभार प्रदर्शन मनू वरठी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)