जुनी कामे पूर्ण करा, नव्यांना हातही लावू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:38 PM2018-02-12T22:38:08+5:302018-02-12T22:38:44+5:30
अधीक्षक अभियंता एस.एस. चारथळ यांनी अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली असता सहकंत्राटदाराने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याची कानउघाडणी केली. 'जुनी कामे पूर्ण करा, नव्यांना हातही लावू नका', असे ठणकावले.
संदीप मानकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : अधीक्षक अभियंता एस.एस. चारथळ यांनी अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली असता सहकंत्राटदाराने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याची कानउघाडणी केली. 'जुनी कामे पूर्ण करा, नव्यांना हातही लावू नका', असे ठणकावले.
अमृत पाणीपुरवठा योजनेची कामे निकृष्ट व मंदगतीने होत आहे. नियोजनाअभावी कामे रखडली असून यासंदर्भात 'लोकमत'ने हा मुद्दा लोकदरबारात मांडताच मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्यांनी गाडगेनगर, राधानगर व विनायकनगरमधील कामांची पाहणी केली. सबकॉन्ट्रक्टर दीपक पाटील यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याची चांगलीच कानउघडणी करण्यात आली.
अमृत योजना ही ११४ कोटींची आहे. पण शहरात अनेक प्रभागांत नवीन पाईपलाईन व इतर कामांसाठी ८३ कोटींचा करारनामा आहे. सदर कंत्राट हा नाशिक येथील पी.एल. आडके यांना मिळाल्याची माहिती मजीप्रा अभियंत्यांनी दिली. ज्या ठिकाणी खोदकाम केले व पाईपही टाकले त्याठिकाणी अर्ध्या रस्त्यांपर्यंत माती तशीच ठेवली आहे. या ठिकाणी लेबर कमी व सुपरवायझरच जास्त दिसत असल्याने कामांवर जबाबदार सुपरवायझर ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, उपअभियंता म्हसकरे, शाखा अभियंता शेंडे, मनपाचे उपअभियंता प्रमोद इंगोले, शाखा अभियंता राजेश आगरकर, मॅनेजर माणिकपुरे तसेच नगरसेवक चंदू बोंबरे उपस्थित होते.
कंत्राटदाराला एक कोटी २७ लाखांचा दंड
कामे ही वेळीत पूर्ण होत नसल्याने व हलगर्जीपणा होत असल्याने आतापर्यंत कंत्राटदारांच्या देयकातून १ कोटी २७ लक्ष रूपये दंड शुल्क वसूल केल्याची माहिती अधीक्षक अभियंता चारथड यांनी दिली. जेव्हापासून कामे मंदगतीने होत आहे. कंत्राटदाराला प्रतिदिन ८९ हजार २६४ रूपये दंड आकारण्यात येत आहे. ११४ कोटींची अमृत योजना असून ८३ कोटींचा पाईपलाईन व इतर कामांचा करारनामा झाला आहे. यामध्ये ५० टक्के निधी हा केंद्र शासनाचा २५ टक्के निधी हा राज्य शासन व २५ टक्के निधी हा मनपाचा या योजनेवर खर्च करण्यात येणार आहे.
लोकांनी जावे कसे?
विनायकनगरातील काळे नामक नागरिकांच्या घराजवळ नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर एक खड्डा बुजविण्यात आला नव्हता. त्यामुळे लोकांना घरात जातानाही अडचण निर्माण झाली होती. कामांच्या पाहणीदरम्यान ही बाब अधीक्षक अभियंत्यांच्या लक्षात येताच लोकांनी जावे कसे, असा सवाल त्यांनी उपअभियंता व शाखा अभियंत्यांना केला व त्वरित हा खड्डा कंत्राटदारांकडू न बुजवून घ्यावा, कामात हलगर्जीपणा होता कामा नये.
कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. कंत्राटदाराला नोटीसही देण्यात येईल. कामे करताना लोकांना त्रास होऊ नये, याची जबाबदारी घ्यावी.
- एस. एस. चारथळ, अधीक्षक अभियंता जीवन प्राधिकरण
जे रस्ते खोदले व पेव्हिंग ब्लॉक काढले ते कामे तातडीने पूर्ण करून घेऊ. यानंतर सतत या कामांवर आमचे लक्ष राहणार आहे.
- प्रमोद इंगोले,
उपअभियंता महापालिका