एडीफायची चौकशी पूर्ण
By admin | Published: June 18, 2016 11:59 PM2016-06-18T23:59:07+5:302016-06-18T23:59:07+5:30
देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरा स्थित एडीफाय शाळेसंदर्भातील चौकशी शनिवारी पूर्ण झाली.
अधिकृत की अनधिकृत? : देवी शिक्षण संस्थेचा मान्यतेचा दावा
अमरावती : देवी एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित कठोरा स्थित एडीफाय शाळेसंदर्भातील चौकशी शनिवारी पूर्ण झाली. दरम्यान एडीफाय शाळेला शासनाची मान्यता मिळाल्याचा दावा शाळा व्यवस्थापनाने शनिवारी रात्री केला.
पालक रविकिरण पाटील व अन्य काही जणांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी एडीफाय शाळेच्या चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी एडीफाय शाळा गाठून चौकशी केली. या चौकशीत प्रथमदर्शनी एडीफायला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची कुठलीही मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवारीसुद्धा एडीफायच्या चौकशीचे गुऱ्हाळ सुरू होते. सायंकाळपर्यंत शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ही शाळा नियमबाह्य असल्याचा दावा केला जात होता. शाळेला मान्यता नसल्याने पालकांकडून उकळलेली रक्कम, त्यांची झालेली फसवणूक याबाबत फौजदारी तक्रार नोंदविण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले होते. सायंकाळच्या सुमारास शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता चौकशी पूर्ण झाली. उशीरा रात्रीपर्यंत आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सोपवू, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही चौकशीचे गुऱ्हाळ सुरूच राहिले. सायंकाळी ७.३० च्या सुमारास देवी एज्युकेशन सोसायटीकडून एडीफाय स्कुलला स्वयंअर्थसहाय्यित शाळा म्हणून परवानगी मिळाल्याचे सांगण्यात आले. तथापि परवानगीचे अधिकृत दस्तऐवज आमच्याकडे पोहोचले नसल्याचे शिक्षण उपसंचालकांनी रात्री ९ च्या सुमारास स्पष्ट केले. शाळेच्या मान्यतेचा मुद्दा आता सोमवारीच निकाली निघेल. खासगी कंपनीची फ्रेंचाईसी असलेली शाळा चालविणे नियमबाह्य आहे. एडीफाय शाळेला शासनमान्यता मिळाली असेल तर नियमांचे काय, हा मुद्दा पुन्हा उपस्थित होणार आहे. (प्रतिनिधी)
उशिरा रात्रीपर्यंत संदर्भीय अहवाल माझ्यापर्यंत पोहोचला नाही. प्राथमिक चौकशीत एडीफाय नियमबाह्य ठरते. अहवाल आल्यानंतरच यावर बोलता येईल.
- एस.बी. कुलकर्णी, उपसंचालक
स्वयंअर्थसहाय्यीत शाळा म्हणून एडीफायला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन २०१६-१७ साठी परवानगी दिली आहे. विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये ते नमूद आहे.
- रवी इंगळे,
संचालक, देवी शिक्षण संस्था