जलसंपदाचे रखडलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:59 AM2018-01-12T00:59:46+5:302018-01-12T00:59:56+5:30
पाचही जिल्ह्यांमध्ये जे प्र्रकल्प रखडले आहेत व ज्या प्रकल्पांवर निधी मंजूर आहे, त्या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी केल्या.
अमरावती : पाचही जिल्ह्यांमध्ये जे प्र्रकल्प रखडले आहेत व ज्या प्रकल्पांवर निधी मंजूर आहे, त्या प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी केल्या.
अविनाश सुर्वे यांनी गुरुवारी येथील दोन्ही मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक घेऊन वेगवेगळ्या बाबींवर आढावा घेतला. विभागातील पाचही जिल्ह्यांतील निर्माणाधीन व निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा आढावा त्यांनी घेतला. प्रकल्पाच्यावतीने अनुशेष निर्मूलन कार्यक्रम अपूर्ण प्रकल्पाचाही आढावा घेण्यात आला. निर्माणाधीन व रखडलेल्या प्रकल्पांचे भूसंपादन, पुनर्वसन, पर्यावरण विभागाची मान्यता तसेच येऊ घातलेल्या बजेटमध्ये प्रस्तावित करण्यात येणाºया विविध प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता, बळीराजा जलसंजीवनी योेजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या विभागातील ६८ प्रकल्पांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर, अमरावतीचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे, विशेष प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र जलतारे यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांसह महत्त्वाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. अंदाजे सात ते आठ तास चाललेल्या या आढावा बैठकीत पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी ज्या प्रकल्पांना अडचण निर्माण झाल्या, त्यावरही मुख्य अभियंत्याशी कार्यकारी संचालकांनी चर्चा केली. निर्माणाधीन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला कार्यकारी संचालक अमरावती येथील मुख्यालयी शिबीर आयोजित करतील, असा निर्णयही या बैठकीत झाल्याची माहिती आहे.