दहावी-बारावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे आव्हानच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:37+5:302021-01-22T04:12:37+5:30
अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात होणार असल्याने तयारी चालविली आहे. त्यामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे ...
अमरावती : राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात होणार असल्याने तयारी चालविली आहे. त्यामुळे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ऑनलाईन अभ्यासात सात-आठ महिने गेले आहेत. मात्र, विद्यार्थ्याना तो काही पचनी पडला नसल्याने काही शाळांनी नव्याने अभ्यासक्रम सुरू केला आहे.
प्रत्येक महिन्याच्या वेळापत्रकानुसार सर्रास शाळांनी ७० टक्क्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. दहावी-बारावीचे ३० ते ४० टक्क्यापर्यंत शिक्षण अपूर्ण आहे. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यावर ऑनलाईमधील त्रुटी पुढे येऊ लागल्या आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत बरेच शिक्षक पोहचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काही शाळांनी दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पुन्हा नव्याने सुरू केला आहे. त्यामध्येही ५० टक्क्यापर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे शिक्षकांनी सांगितले. हल्ली वर्गात
१०० टक्के उपस्थिती नसल्यानेही शाळांपुढे आव्हान आहे. ग्रामीण भागात अजूनही पृूर्णपणे एसटी बस सुरू झाल्या नाही. शहरातील वसतिगृहेसुद्धा बंद आहेत.
---------------------
अभ्यास ७० टक्के पूर्ण
दहावीचा अभ्यासक्रम ७० टक्क्यापर्यंत पूर्ण झाल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली. काही शाळांनी वर्ग सुरू झाल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करत ५० टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ऑनलाईनमध्ये राहिलेल्या त्रुटी प्रत्यक्ष वर्गात दुरुस्त केल्या जात आहेत.
----------------
बारावीचा नवा पॅटर्न
यंदा बारावीचा प्रश्नपत्रिकांचा नवा पॅटर्न बदलणार असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमाेर मोठे आव्हान उभे आहे. अभ्यासक्रमातील बदलासंदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ती माहिती विद्यार्थ्यांपर्यत देऊन परीक्षेची तयारी करून घ्यावी लागणार आहे.
-------------------
‘दहावीचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असला तरी वर्गातील शिक्षण महत्त्वाचे वाटते. शिक्षकांना शंका विचारल्याने अभ्यास अधिक सोपा होत आहे. परीक्षा अद्याप जाहीर नसल्याने वर्गातील अभ्यासत्रच लक्ष केंद्रित केले आहे.
- नंदिनी मराठे बडनेरा, दहावीची विद्यार्थिनी
-------------------------
‘शाळा सुरू झाल्याने प्रॅक्टिकल्स करता येत आहेत. यंदा प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न वेगळा असल्याने प्रत्यक्ष वर्गात तो जाणून घेत आहे. सहा-सात महिन्यातील अभ्यासाचे रिव्हिजन होऊ लागले आहे.
- अमर देशमुख, अमरावती. बारावीचा विद्यार्थी
-----------------------
शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम अगोदरच कमी केला आहे. २३ नाेव्हेंबरपर्यंत ऑनलाईन शिक्षण पूर्ण झाले. ऑफलाईन शिक्षणाने वेग घेतला असून, बारावीचे विद्यार्थी प्रात्यक्षिकासाठी येत आहेत. वेळेच्या आत अभ्यासक्रम पूर्ण होईल, अशी तयारी सुरू आहे.
- वि.गो. ठाकरे, प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती.
---------------
२३ नाेव्हेंबरपासून नियमित शाळा सुरू आहे. पहिले आठ दिवस उपस्थिती कमी होती. मात्र, आता ७५ टक्क्याच्यावर उपस्थिती आहे. दरदिवशी तीन तास अभ्यासक्रम शिकविला जात आहे. वेळापत्रकानुसार शिक्षण सुरू आहे. वेळेपूर्वी अभ्यासक्रम पूर्ण होईल, असे नियोजन आहे.
-आर. के. कोल्हे, मुख्याध्यापिका, राजेश्वर युनियन हायस्कूल, बडनेरा