‘सुपर’मध्ये स्तन कर्करोगाची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी; गाठ काढून केली प्लास्टिक सर्जरी
By उज्वल भालेकर | Published: July 2, 2023 06:24 PM2023-07-02T18:24:45+5:302023-07-02T18:25:00+5:30
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे एका ५२ वर्षीय महिलेच्या स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर)ची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
अमरावती: स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे एका ५२ वर्षीय महिलेच्या स्तन कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर)ची जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. या महिलेला थर्ड स्टेजमधील स्तनाचा कर्करोग होता. पाच तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये कर्करोगाची गाठ काढून प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील ही महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त होती. ती १९ जून रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. या महिलेला थर्ड स्टेजच्या स्तनाचा कर्करोग होता. यापूर्वी या महिलेवर केमोथेरपी करण्यात आली; परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेत जवळपास १० सें.मी. बाय ६ सें.मी. कर्करोगाची गाठ काढून टाकण्यात आली.
त्यानंतर त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात आली. पाच तास चाललेल्या शस्त्रक्रियेकरिता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमित बागडिया, डॉ. अनुप झाडे, डॉ. रणजित मांडवे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. नंदिनी देशपांडे यांनी सहकार्य केले. यासाठी अधिसेविका चंदा खोडके, माला सुरपाम यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका अर्चना डगवार, ज्योती गोडसे, सारिका चांदेकर, मनीषा राऊत, निशिगंधा डांगे तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील डॉ. पायल रोकडे, डॉ. देवयानी मुंदाने, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, औषध विभागातील हेमंत बनसोड, सारिका कराडे, ज्ञानेश्वर गोटे, सुधीर मोहोळ, आशिष अत्राम, ज्ञानेश्वर डोंगरे यांचे सहकार्य लाभले.