कडक निर्बंधांना चांदूर रेल्वेत संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:33+5:302021-04-16T04:13:33+5:30
व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन चांदूर रेल्वे : राज्य शासनाने करोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ...
व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
चांदूर रेल्वे : राज्य शासनाने करोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या निर्बंधांना चांदूर रेल्वे शहरात गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापारी व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.
चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे, मुख्याधिकारी मेघना वासनकर, सहायक ठाणेदार राऊत हे कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरले होते. यादरम्यान नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात गर्दी करून नये व दुकानदारांनीसुद्धा खबरदारी घ्यावी, अशा सूचना दिल्या. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जुना मोटार स्टँड येथे अकारण बाहेर फिरणाऱ्यांची चौकशी केली व केवळ कामानिमित्य घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या.
-------------
सरकारने सर्व व्यापाऱ्यांचा विचार करावा
लहानमोठे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना फक्त इतर दुकाने सुरू असल्यावरच होतो का? शासनाने काही वेळ सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून व्यापारी कामगारांचे पगार देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल, असे मत गाडगेबाबा मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव खंडार यांनी व्यक्त केले.
-----------कर्मचाऱ्यांचा पगार द्यायचा कसा?
माझ्या गांधी चौकातील कपड्याच्या दुकानात १५ कर्मचारी कामावर आहेत. दुकान बंद असल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत. दुकानातील कर्मचाऱ्यांना पगार कुठून देणार? कामगारांना पगार न दिल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबावर उपासमारीची परिस्थिती ओढवेल. शासनाने सर्व व्यापाऱ्यांचा व कामगारांचा विचार करून आम्हालाही सूट द्यावी, असे मत जावेद राराणी यांनी व्यक्त केले.