उत्पादकतेसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:17+5:302021-05-11T04:14:17+5:30

बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करा - कृषिमंत्री अमरावती : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी यंदा उत्पादकता वर्ष म्हणून उपक्रम ...

The concept of ‘One Village One Variety’ for productivity | उत्पादकतेसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना

उत्पादकतेसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना

Next

बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करा - कृषिमंत्री

अमरावती : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी यंदा उत्पादकता वर्ष म्हणून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्व पातळीवर उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना राबविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना जादाचे उत्पन्न मिळण्यास मदत होईल. ‘विकेल ते पिकेल’ यानुसार काही नावीन्यपूर्ण पिके घेण्याकडे शेतकऱ्यांना वळविल्यास पाच टक्क्यांपर्यंत पीक बदल होण्यास मदत मिळेल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी सांगितले.

विभागस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ना. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखेडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे, नवनाथ कोळपकर, डॉ. के. बी. खोत, नरेंद्र नाईक उपस्थित होते.

शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाने काटेकोरपणे नियोजन करावे, यासाठी गाव आणि शेतकरी पातळीवर बियाणे उपलब्धतेचे नियोजन करावे, शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होण्यासाठी दररोज आढावा घेण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

दरवर्षीच्या खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा प्रश्न अधिक जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन करणे आवश्यक आहे. बियाणे उपलब्ध करण्यासाठी शासकीय जमिनी तसेच उपलब्ध जागेवर बियाणांसाठी लागवड झाल्यास उपयुक्त ठरेल, असे ना. भुसे म्हणाले.

बॉक्स

पीककर्ज वेळेत मिळण्यासाठी नियोजन

शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळण्यासाठी नियोजन करावे. खरीप हंगामात पीककर्ज मिळण्यासाठी पारदर्शक पद्धती राबविण्यात यावी. शासनाने ३१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम बँकांना उपलब्ध करून दिलेली आहे. येत्या काळात उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.

बॉक्स

गावपातळीवर कृषी विकास समिती

शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ तातडीने मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून ३३ हजार हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करण्यासाठी प्रत्येक गावात जमीन सुपिकता फलक लावण्यात येणार आहे. शेतीचा गावपातळीवर विकास होण्यासाठी ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The concept of ‘One Village One Variety’ for productivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.