खरीप पिकांवर ‘शंखी’चा 'अटॅक'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 05:00 AM2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:11+5:30
शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. उभ्या पिकाचे होत असलेले नुकसान शेतकरी उघड्या डोळ्याने बघत आहे.
ब्राह्मणवाडा थडी : यंदा निसर्गाने साथ दिल्यामुळे कोरोनाच्या सावटातच शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. मात्र, बोगस बियाण्यांचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांमागे लागले. त्यातून कसेबसे सावरत दुबार तिबार-पेरणी केली; पीकही बहरले. सद्यस्थितीत सोयाबीन फुलोरवरही आलेले आहे. मात्र, शंख (गोगलगाय) रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर नवीन संकट कोसळले आहे.
शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नाही. उभ्या पिकाचे होत असलेले नुकसान शेतकरी उघड्या डोळ्याने बघत आहे. शंखीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्नेलकिल व लारविन हे किटकनाशक कृषी केंद्रात उपलब्ध नसल्याने पीक कसे वाचवावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
शंख रोगाचा प्रादुर्भाव असलेले नेमके क्षेत्रफळ सध्या सांगता येणार नाही. सर्वेक्षण सुरू आहे. पुण्याहून कीटकनाशक औषधी बोलावली. ती दोन दिवसांत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.
- अंकुश जोगदंड,
तालुका कृषी अधिकारी, चांदूर बाजार
शंखीच्या नियंत्रणाकरिता खोडाभोवती प्लास्टिक पन्नी गुंडाळावी. वाळूचा गोल रिंग खोडाभोवती टाकावा. स्नेलकिल हेक्टरी पाच किलो बागेमध्ये टाकाव्यात. ओलित दिवसाच करावे.
- प्रशांत उल्हे
प्राचार्य, कृषी तंत्र निकेतन, ब्राह्मणवाडा थडी
शंख रोगाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी उपलब्ध असलेली औषधी ही खूप महागडी असून, त्याने पूर्णपणे शंक रोगाचा नायनाट होत नाही. कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन आणि नियोजन आवश्यक आहे.
- राजेश वानखडे,
शेतकरी, ब्राह्मणवाडा थडी