जिल्हा ग्रंथोत्सवाचा थाटात समारोप
By admin | Published: February 17, 2016 12:05 AM2016-02-17T00:05:57+5:302016-02-17T00:05:57+5:30
स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला.
पुस्तक परीक्षण : मान्यवरांचे मार्गदर्शन
अमरावती : स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात आयोजित तीन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. समारोपीय कार्यक्रमाला महापौर चरणजितकौर नंदा, नगरसेवक प्रशांत वानखडे, ग्रंथपाल प्र.म.राठोड, सचिव ग्रंथालय सचिव राम देशपांडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, गोपाल उताणे उपस्थित होते.
तीन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये सकाळी ११ वाजता 'सार्वजनिक ग्रंथालयातील पुस्तक परीक्षण' या विषयावर परिसंवाद रंगला. यामध्ये समर्थ कनिष्ठ महाविद्यालय अमरावतीचे राजेंद्र राऊत यांनी 'दारणा' या ऐतिहासिक कादंबरीवर भाष्य केले.
देशबंधू सार्वजनिक वाचनालय वरुडचे ग्रंथपाल चंद्रकांत चांगदे यांनी सार्वजनिक ग्रंथालयातील कामाविषयी, पुस्तके हाताळण्याविषयी माहिती दिली. वाचकाला हवे ते पुस्तक देण्यासाठी ग्रंथापालानेदेखील वाचनाद्वारे अद्यावत रहावे, असे त्यांनी सांगितले. या संवादाचे अध्यक्ष दयार्पूरचे प्राध्यापक रमेश देशमुख होते. प्रसिद्ध वऱ्हाडी लेखिका प्रतिभा इंगोले यांनी लेखकाच्या दृष्टीतून पुस्तक परीक्षणाचे महत्त्व सांगितले.
माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी ग्रंथालय चळवळीवर प्रकाश टाकला. ग्रंथपालांच्या समस्या व अडचणी यावर जिल्हा ग्रंथालय संघाच्या माध्यमातून संघटित प्रयत्न करू, असे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष प्रदीप चौधरी यांनी सांगितले. या ग्रथालय महोत्सवाचा विद्यार्थी, नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली. असे महोत्सव नियमित आयोजित व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा. सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. संवादातील सर्व वक्तक्त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तीन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाचा समारोप थाटात संपन्न झाला. (प्रतिनिधी)