रेड्डींच्या अटकेसाठी गोपनिय ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:16 AM2021-04-30T04:16:33+5:302021-04-30T04:16:33+5:30
नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी सहआरोपी करण्यात आलेल्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी ...
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी सहआरोपी करण्यात आलेल्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याच्या अटकेची हालचाल मंगळवारी सायंकाळपासून गतिमान झाली. रेड्डींचे मोबाईल लोकेशन देखील अटकेचा मार्ग सुकर होण्यास प्रभावी ठरले.
श्रीनिवास रेड्डी याला अटक झाल्याची माहिती ‘लोकमत’ने पोलीस अधिकारी दुजोरा देत नसतानाही अत्यंत गोपनीय पद्धतीने काढली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा तत्कालीन निलंबित आरोपी एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला नागपूर येथील वनविभागाच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सेमिनार व्हील्स येथून बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली. ही अटकेची कारवाई पोलिसांनी अत्यंत गोपनीय ठेवली. अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविताच श्रीनिवास रेड्डी याच्या अटकेबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु पोलीस या संदर्भात काही एक बोलायला तयार नव्हते हे विशेष.
हरिसाल येथे तब्बल पाच तास सरवदे यांनी बयाणांची खातरजमा करून घेतली होती. श्रीनिवास रेड्डी हा नागपूरला आहे किंवा कसा यासंदर्भात त्याचे मोबाईल लोकेशन सुद्धा घेण्यात आल्याची माहिती आहे. तेथूनच त्याला तत्काळ अटक करण्यात आली.
बॉक्स
आणि एसडीपीओ पूनम पाटील अर्ध्यातून गेल्या
हरिसाल येथे आयपीएस प्रज्ञा सरवदे निसर्ग निर्वाचन संकुलातील एका खोलीत कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून बयान नोंदवित असताना तपास अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पूनम पाटील हरिसाल येथे आल्यावर आयपीएस सरवदे यांना मंगळवारी भेटून काही वेळातच निघून गेल्या. त्यानंतरच रेड्डीच्या अटके संदर्भात हालचाल सुरू झाली असल्याची माहिती आहे. तर बुधवारी मुंबईहून आलेल्या पथकाने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचा कार्यालयातून अटकेसंदर्भात आवश्यक पुरावे असल्याचे व पुढील सोपस्कार करण्याचे आदेश मिळाल्यावर तत्काळ दुपारी २.३० वाजता अत्यंत गोपनीय पद्धतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या एका चमूला नागपूरला रवाना करण्यात आले.