आयुक्तांच्या खुर्चीची जप्ती टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:03 PM2019-02-06T22:03:36+5:302019-02-06T22:03:56+5:30
अकोली वळणरस्त्याचे भूसंपादनप्रकरणी शेतकऱ्याला १०.१० लाखांचा मोबदला दिला नसल्याने जिल्हा दिवाणी न्यायालयाने स्पेशल बेलीफद्वारे बुधवारी जप्ती वारंट बजावला. महापालिका प्रशासनाने दोन लाखांचा भरणा करून जप्ती टाळली व उर्वरित रकमेकरिता एका महिन्याचा अवधी मागितला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अकोली वळणरस्त्याचे भूसंपादनप्रकरणी शेतकऱ्याला १०.१० लाखांचा मोबदला दिला नसल्याने जिल्हा दिवाणी न्यायालयाने स्पेशल बेलीफद्वारे बुधवारी जप्ती वारंट बजावला. महापालिका प्रशासनाने दोन लाखांचा भरणा करून जप्ती टाळली व उर्वरित रकमेकरिता एका महिन्याचा अवधी मागितला.
अकोली वळणरस्त्याकरिता मौजा नवसारी येथील ईश्वरसिंह रामसिंह पवार यांची ०.३२ हेक्टर आर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र, २ लाख ६० हजारांचा मोबदला मान्य नसल्याने त्यांनी जिल्हा दिवाणी न्यायालयात दाद मागितली. त्यांना बाजारभावाप्रमाणे १० लाख १० हजार ५२५ रुपये मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. मात्र, महापालिका प्रशासन मुदतीत रकमेचा भरणा न करता टाळाटाळ करत असल्याची बाब पवार यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली असता, जिल्हा दिवाणी न्यायालयाद्वारे स्पेशल बेलीफद्वारे जप्ती वारंट बजावला. महापालिका आयुक्त संजय निपाणे व विधी अधिकारी चव्हाण यांनी पवार यांच्याशी चर्चा करून दोन लाखांचा धनादेश दिला व उर्वरित रक्कम एक महिन्यात देण्याचे मान्य केल्याने महापालिकेवरील जप्ती टळली.