जाहिरात फलकांचा झाडांना विळखा
By admin | Published: February 14, 2017 12:02 AM2017-02-14T00:02:34+5:302017-02-14T00:02:34+5:30
पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : खिळे मारुन लावले जातात फलक
अमरावती : पर्यावरण रक्षणासाठी झाडांचे अतिशय महत्व असताना जाहिरातबाजांना त्याचा विसर पडला आहे. चौक, बस थांबे, इमारती आदी ठिकाणी जाहिरात ही नित्याचीच बाब असली तरी झाडांवर खिळे ठोकून अनेक जण जाहिराती करीत असल्याचे वास्तव आहे. झाडांवरील जाहिरातींमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये असंतोष उसळला आहे.
शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदी भागात सुशोभिकरण आणि शितल छाया मिळावी, यासाठी झाडे लावण्यात आली आहेत. काही झाडे पुरातन असल्याने त्यांचा आवाकाही मोठा झाला आहे. मात्र या मोठ्या वृक्षांचा काही महाभागांनी जाहिरातीसाठी वापर सुुरू केला आहे. काही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयात झाडांवर कायमस्वरुपी जाहिराती झळकत असल्याचे चित्र आहे. जाहिरात फलक लावण्यासाठी झाडांना खिळे ठोकून ते लावण्यात आले आहे. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावर झाडांवर लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवर विद्युत रोषणाईदेखील केली जाते. जिल्हा परिषद, महापालिका अधिकाऱ्यांना झाडांवर जाहिराती दिसत असताना कारवाई का केली जात नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा, वनसंपदेचे संवर्धन करा,’ अशा घोषणा देत पर्यावरण सुरक्षेचे धडे देते. मात्र दुसरीकडे झाडांचा जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनाच्छादन असणे आवश्यक आहे. परंतु राज्यात एकूण २० टक्के वनाच्छादन असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे तापमानात वाढ, वातावरणात बदल, बदललेले नैसर्गिक ऋतुचक्र, अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वाढता दुष्काळ अशा गंभीर समस्यांच्या सामोरे जावे लागत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी पावसाळ्यात लोकसहभागातून १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्यात राबविण्यात आला. तर दुसरीकडे परिश्रम, मेहनतीने वाढविण्यात आलेल्या वृक्षावर खिळे ठोकून जाहिरात फलक लावण्यात येते. फ्लेक्स लावण्यात अडथळा निर्माण झाल्यास प्रसंगी झाडाच्या फांद्याही छाटल्या जातात. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यालगत झाडांवर खिळे मारुन जाहिरात करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. नागरिकांनी झाडांवर खिळे मारुन वृक्षाचे विद्रुपीकरण थांबवावे.
- प्रमोद येवतीकर, अधीक्षक, उद्यान विभाग, महापालिका.
झाडांवर खिळे ठोकता येत नाही. तरिदेखील शहरात राजरोसपणे झाडांवर खिळे ठोकून जाहिरातींचे फलक लावले जातात. ही बाब नियमबाह्य आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.
- निलेश कंचनपुरे
पर्यावरण प्रेमी, अमरावती.