मुलीनों, समस्यांचा सामना आत्मविश्वासाने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:15 PM2017-09-12T23:15:57+5:302017-09-12T23:15:57+5:30
मुलींना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणी पालकांना व शिक्षकांना सांगितल्या....
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : मुलींना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणी पालकांना व शिक्षकांना सांगितल्या तर त्यावर सहज मात करता येते. मात्र, यासाठी आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे समस्या सोडविण्याआधी आत्मविश्वास वाढविण्याची गरज आहे, असे आवाहन मनीषा जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चांदूररेल्वे येथे किशोरी उत्कर्ष मंच अंतर्गत लैंगिक, मानसिक, आरोग्य व सुरक्षा समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या.
आजच्या धकाधकीच्या काळात विद्यार्थी दररोज अनेक विद्यार्थीनींना विविध प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात. किशोरावस्थेत शरीरात होणारे बदल व लैंगिक आचार, उपाय, पोषक आहार व स्वच्छता, शारीरिक, मानसिक व भावनिक विकास व पोषण सुसूत्रता, मन व इंद्रिये नियंत्रण, नैतिक व वैज्ञानिक मूल्यांची जोपासना इत्यादी विषयीचे ज्ञान मुलींना मिळणे आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या.
सकारात्मक दृष्टिकोन वाढवू
समुपदेशनानंतर मुलींना प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी प्रश्नांची उत्तरे योग्य व सकारात्मक दृष्टीने दिली. समाजात वावरताना मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यावर भर देण्याचा विश्वास यावेळी मुलींनी व्यक्त केला. अडचणींशी सामना करण्यासाठी त्या स्वत:ला आई वडिलांचा व शिक्षकांचा सहभाग घेऊन त्यावर उपाय शोधतील, असेही मुलींनी यावेळी सांगितले.