कोरोना लसीकरणाबाबत ग्रामीणमध्ये संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:18+5:302021-06-09T04:16:18+5:30
श्यामकांत पाण्डेय धारणी : मेळघाटातील अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या नागरिकांमध्ये एक शतकानंतर आलेल्या कोविड या गंभीर आजाराबाबत अनास्था दिसून ...
श्यामकांत पाण्डेय
धारणी : मेळघाटातील अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या नागरिकांमध्ये एक शतकानंतर आलेल्या कोविड या गंभीर आजाराबाबत अनास्था दिसून येत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमात्र पर्याय असल्याचे जाहीर झाल्यानंतरसुद्धा ग्रामीण स्तरापर्यंत लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यात आदिवासी जमातीचे अधिक प्रमाणात वास्तव्य आहे. आदिवासी जनतेत प्राथमिक स्तरावर झालेल्या आजाराबाबत भुमका आणि परिहार यांच्याकडे उपचार घेण्याची परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण जगाला हादरून सोडलेले कोरोना या विषाणूच्या गंभीरतेबाबत मेळघाटातील जनता जागरूक होण्यापेक्षा अंधश्रद्धेला खतपाणी देत असल्याची प्रचिती आरोग्य आणि महसूल विभागाला येत आहे.
लसीकरणाला प्रतिसाद देण्याऐवजी अपप्रचारच मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. कोरोना या आजारापासून कायमची सुटका करायचे असल्यास लसीकरण हेच एकमात्र उपाय असल्याचे सिद्ध झाले. शहरी भागातील नागरिकांपेक्षा ग्रामीण भागात लसीकरणाबाबत प्रतिसाद नसल्याचे ग्रामस्तरावर दिसून आले आहे. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिताली सेठी, तहसीलदार अतुल पटोडे आणि आरोग्य विभागाची चमू मेळघाटातील गावागावात पोहोचून कोरोनाचे लसीकरण करण्याबाबत जागरुकता निर्माण करीत आहे. परंतु त्यांनासुद्धा ग्रामीणमध्ये लसीकरणाबाबत अनेक ठिकाणी उलट अनुभव आले आहे.