काँगे्रसचा दणका, खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:41 PM2018-10-15T22:41:03+5:302018-10-15T22:41:28+5:30
जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीनची सर्वच केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व खरेदी सुरू करण्यासह अन्य मागण्यांसाठी आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या दालनात सोमवारी दुपारी १ वाजतापासून ठिय्या दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात मूग, उडीद व सोयाबीनची सर्वच केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व खरेदी सुरू करण्यासह अन्य मागण्यांसाठी आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या दालनात सोमवारी दुपारी १ वाजतापासून ठिय्या दिला. अखेर शासनाने नमते घेत सर्व केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी व चार केंद्रांवर मूग व उडदाची खरेदी सोमवारपासून सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे दसरा -दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अपुºया पावसाने खरीप उद्ध्वस्त झाल्यावरही शासनाने जाचक अटींचा निकष लावीत सहा तालुक्यांना दुष्काळाची कळ लागू केली. कर्जवाटपही बँकांनी नाममात्र केल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकºयांना खासगी सावकारांजवळून कर्ज घ्यावे लागत आहे. या सर्व मुद्यांवर शुक्रवारी जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सोमवारपर्यंत केंद्रावर खरेदी सुरू न झाल्यास जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
जिल्ह्यातील काँंग्रेससह युवक काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या आवारात एकवटले व दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन आ. यशोमती ठाकूर, आ. वीरेंद्र जगताप, बबलू देशमुखांसह जिल्हा ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या दिला. युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांनी दालनातच बैठक मांडली. यावेळी शासन निषेधाच्या व शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या.
जिल्ह्यतील सात केंद्रांना विनाकारण ब्लॅकलिस्ट करून शेतकऱ्यांची अडवणूक केल्यानेच शेतकऱ्यांची खेडा खरेदीत लूट होत असल्याचा आरोप यावेळी आमदारद्वयींनी केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सातत्याने शासन व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढल्याने सोमवारपासून सर्व केंद्रांवर आॅनलाईन खरेदी व दर्यापूर, मोर्शी, धामणगाव रेल्वे व अचलपूर या चार केंद्रावर मूग व उडदाची खरेदी सुरू करीत असल्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, माजी आमदार केवलराम काळे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, महेंद्रसिंग गैलवार, प्रकाश साबळे, हरिभाऊ मोहोड, भागवत खांडे, संजय मार्डीकर, प्रमोद दाळू, अभिजित देवके, वैभव वानखडे, बिट्टू मंगरोळे, दयाराम काळे, बंडू देशमुख, नितीन दगडकर, सुरेश निमकर, वासंती मंगरोळे, पंकज मोरे, परिक्षित जगताप, राहुल येवले, श्रीराम नेहर, बापूराव, रितेश पांडव, गायकवाड, बबलू बोबडे, बच्चू बोबडे, मुकदर खॉ पठाण, दिलीप काळबांडे, रमेश काळे, मुकुंद देशमुख, वीरेंद्र जाधव, सुनील जुनघरे, शिल्पा महल्ले, ज्योती ठाकरे आदी उपस्थित होते.
सर्वच केंद्रांवर होणार नोंदणी व खरेदी
गतवर्षी आॅनलाइन व आॅफलाइन खरेदीच्या घोळात जिल्ह्यातील सात खरेदी विक्री संस्थांना ब्लॅकलिस्टेड केले होते. मात्र, काही केंद्रांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याची बाब आ. वीरेंद्र जगताप यांनी जिल्हाधिकाºयांचे यापूर्वीच निदर्शनात आणून दिल्याने काही संस्थांना काळ्या यादीतून वगळण्यात येऊन अटी, शर्तीच्या अधिन मंजुरी मिळाली आहे. या सर्व केंद्रांवर आता आॅनलाइन नोंदणी व खरेदीचे होणार आहेत.
धामणगावात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार होत आहे. शेतकºयांजवळून कमी भावात खरेदी करायचे अन् नाफेडला अधिक भावात विकायचा, हा गोरखधंदा सुरू आहे. आठ दिवसांत सोयाबीनची खरेदी सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू.
- वीरेंद्र जगताप,
आमदार, चांदूर रेल्वे
सर्व केंद्रांवर सोमवारपासूनच नोंदणी व चार केंद्रावर मूग, उडदाची खरेदीचे लेखी आश्वासन मिळाले. सोयाबीन खरेदीसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. सहा तालुक्यांत नव्हे, तर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा
सर्वच केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाले. सोयाबीन खरेदीचे आदेश नाहीत, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. आम्ही पुढच्या सोमवारपर्यंतची मुदत प्रशासनाला दिली आहे. त्यानंतर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू.
- बबलू देशमुख,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी