भाजप शासनाविरोधात काँग्रसेचे नेते एकवटले
By admin | Published: February 19, 2016 12:38 AM2016-02-19T00:38:57+5:302016-02-19T00:38:57+5:30
भाजप सरकारने दुष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व सामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले
अमरावती : भाजप सरकारने दुष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व सामान्यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. आकसबुध्दीतून काँग्रेस नेत्यांवर कारवाई करण्याचा एकछत्री कार्यक्रम भाजपा सरकारने सुरू केला आहे. शासनाच्या या पक्षपाती धोरणाचा निषेध करण्यासाठी गुरूवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसचे आजी-माजी आमदार व कार्यकर्ते एकवटले. जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्यातील भाजप सरकारने काँग्रेसच्या कार्यकाळातील अनेक जनहिताच्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. यामध्ये प्रामुख्याने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे उदाहरण देता येईल. आघाडी सरकारने सुरू केलेले आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या अभियानातून अनेक गावांचा कायापालट झाला आहे. मात्र, या लोकल्याणकारी अभियानास भाजप शासनाने गुंडाळण्याचा निर्णय घेतला.
अंबानगरीचे आराध्य दैवत कर्मयोगी श्रीसंत गाडगेबाबांंनी निष्काम कर्मयोग व स्वच्छतेचा संदेश दिला. अशा कर्मयोगाच्या नावे सुरू असलेले यशस्वी अभियान गुंडाळण्याची या सरकारची भूमिका अतिशय निंदनीय असल्याच्या भावना काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या समोर व्यक्त केल्यात.
भाजप सरकारने विकासाची कामे न करता काँग्रेस नेत्यांवर सुडभावनेतून कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. हे चूक आहे. लोकसमस्या न सोडविल्यास आता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल.
-यशोमती ठाकूर, आमदार तिवसा
काँग्रेसची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर अन्याय करून त्यांना वेठीस धरण्याचे प्रकार शासनाने थांबवावेत आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे.
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
भाजप सरकार केवळ सूडाचे राजकारण करीत आहे. याचा मी निषेध करतो, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शासनाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान त्वरीत सुरू करावे,
- वीरेंद्र जगताप
आमदार, धामणगांव रेल्वे
सरकारने दुष्काळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा. काँग्रेस नेत्यांवर केली जाणार कारवाई थांबवावी. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.
- नरेशचंद्र ठाकरे, माजी आमदार मोर्शी