अस्वच्छतेवर काँग्रेसही आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:07 PM2018-07-20T23:07:19+5:302018-07-20T23:07:42+5:30
शहरात जागोजागी पाणी व कचऱ्याचे ढीग साचल्याने घाणीचे साम्राज्य पाहता, आरोग्य विभागातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी घेऊन शुक्रवारी युवक काँग्रेसने महापालिका आयुक्तांना घेराव घातला. आयुक्तांना मच्छरदानी भेट देऊन कार्यकर्त्यांनी शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता.
अमरावती : शहरात जागोजागी पाणी व कचऱ्याचे ढीग साचल्याने घाणीचे साम्राज्य पाहता, आरोग्य विभागातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी घेऊन शुक्रवारी युवक काँग्रेसने महापालिका आयुक्तांना घेराव घातला. आयुक्तांना मच्छरदानी भेट देऊन कार्यकर्त्यांनी शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता.
शहारात डेंग्यूने थैमान घातले असून या जीवघेण्या आजाराने अमरावतीकर बळी पडत आहेत. महालक्ष्मीनगर, पार्वतीनगर, अंबाविहार या परिसरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तेथील नागरिक शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. काही रुग्णांना तर नागपूरला हलविण्यात आले आहे. ही परिस्थिती निर्माण झाली असताना शहरात डेंग्यूचे रुग्ण नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महापालिका अधिकारी उपाययोजना सोडून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.
महापालिकेने ठोस पावले उचलावीत
डेंग्यूविषयी जनजागृती, फॉगिंग मशीन व फवारणी करून नागरिकांना या संकटातून सोडविण्याचे प्रयत्न महापालिकेने करावेत, त्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी काँगे्रेसने केली . सोबतच आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना निलंबित करून सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी युवक काँग्रेस अध्यक्ष राजा बागडे, समीर जवंजाळ आदींनी महापालिका आयुक्तांना निवेदनातून केली. आठ दिवसांत उपाययोजना न झाल्यास युवक काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, अशा इशाराही काँग्रेसने महापालिका आयुक्तांना दिला आहे.