‘कर्जमाफी’साठी काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:08 AM2017-07-25T00:08:32+5:302017-07-25T00:08:32+5:30
शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याबाबत बँकांना अजूनही ठोस अशा सूचना व आदेश प्राप्त झाले नाही,
तहसीलदारांना निवेदन : तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याबाबत बँकांना अजूनही ठोस अशा सूचना व आदेश प्राप्त झाले नाही, तसेच १० ह रुपये ची तत्काळ मदतही मिळाली नसल्याने सोमवारी जिल्ह्यात विविध तालुका मुख्यालयी स्थानिक काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार ३० जून २०१७ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी, नागरी बँका, मायक्रो फायनान्स, पतसंस्था यांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तिवसा तालुक्यात तहसीलदार राठोड यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख दिलीप काळबांडे, संजय देशमुख, लुकेश केने, राजकन्या खाकसे, वैभव वानखडे, भारत ढोणे, बबलू मक्रमपुरे, रविभाऊ राऊत ,प्रकाश माहोरे, दीपक पावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दर्यापुरात तहसीलवर मोर्चा
दर्यापूर : शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात तालुका काँग्रेसने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, दुबार पेरणीचा मोबदला मिळालाच पाहिजे, या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, बापूसाहेब कोरपे, सुनील गावंडे, अभिजित देवके, शशांक धर्माळे, बबन देशमुख, बळवंत वानखडे, दिलीप चव्हाण यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
अंजनगावातही ठिय्या आंदोलन
अंजनगाव : काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अरुण चौखंडे, हेमंत येवले, प्रदीप देशमुख, सुभाष गीते, बाबुराव साबळे, सत्यविजय निपाने, गजानन वानखडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.