तूर खरेदीच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:08 PM2018-05-18T22:08:15+5:302018-05-18T22:08:28+5:30
शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तूर खरेदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. जिल्हाभरात अद्यापही ३४ हजार शेतकऱ्यांच्या घरात तूर पडून असल्याचे बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच जिल्ह्यातील ७० हजार १९७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असताना, अद्यापही ३४ हजार ६८५ टोकनधारक शेतकरी आहे. याशिवाय इतरही शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. असे असताना जिल्हाभरातील १२ ठिकाणचेही शासकीय तूर खरेदी केंद्र शासनाने १५ मेपासूृन बंद केली आहे. त्यामुळे या वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बंद असलेली तूर खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा जिल्हाभर काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
तुरीची खरेदी पूर्ण न करताच ही खरेदी केंद्र बंद केली. भाजप सरकार हे शेतकरीविरोधी व थापाडे असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी केला. याप्रसंगी शिवाजी हरणे, बाळासाहेब टोळे, किशोर देशमुख, रत्नाकर करुले, श्रीपाल पाल आदी उपस्थित होते.