पेट्रोल, डिझेल सेवाकर वाढीमुळे काँग्रेस संतप्त
By admin | Published: June 8, 2016 12:05 AM2016-06-08T00:05:59+5:302016-06-08T00:05:59+5:30
मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्रीनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत अनुक्रमे ४ रूपये आणि २.४० पैशांची दरवाढ शासनाने केली.
जिल्हाभर आंदोलन : शासनाच्या विरोधात निदर्शने
अमरावती : मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्रीनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत अनुक्रमे ४ रूपये आणि २.४० पैशांची दरवाढ शासनाने केली. इतकेच नव्हे तर सेवाकरात ०.५ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय विनाअनुदानित सिलिंडरचे दरसुद्धा वाढविल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात भाजप शासनाचा जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनात यानिमित्ताने आंदोलन करण्यात आले.
एकीकडे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना शासनाने कोणत्या हेतुने दरवाढ केली?, असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. केंद्रात भाजपचे शासन आल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घटले आहेत. असे असूनही शासनाने मात्र पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली. त्यामुळे ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजप शासनाचा निषेध करण्यात आला. याविरोधात जिल्हा, तालुका पातळीवर काँग्रेस पक्षाचेवतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व पदाधिकाऱ्यांनी तर तालुकास्तरावर तहसीलदारांना तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. अचलपूर, तिवसा, दर्यापूरसह सर्व तालुक्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपसरकारविरोधात नारेबाजी केली. दर्यापूर येथे सुधाकर भारसाकळे, बबन देशमुख, श्रीकांत होले, शिवाजी देशमुख, सुनील गावंडे, प्रदीप देशमुख, गजानन देवतळे, गजानन जाधव यांनी आंदोलनात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)