भारनियमन विरोधात शहर काँग्रेसने विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:26 PM2017-09-16T23:26:24+5:302017-09-16T23:26:42+5:30
शहरात महावितरणद्वारा भारनियमन सुरू आहे. ते त्वरित बंद करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे ....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात महावितरणद्वारा भारनियमन सुरू आहे. ते त्वरित बंद करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शनिवारी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे यांना याबाबत जाब विचारला.
सध्या शहरातील विविध फिडवर महावितरणकडून वेळीअवेळी भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शहरातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. भारनियमामुळे शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तोही मिळणे कठीण होऊन बसले आहे. परिणामी पाण्यासाठीही मुकावे लागते. वाढत्या भारनियमनामुळे नागरिकांसह, व्यापारी, वैद्यकीय क्षेत्र त्रस्त आहे. फिडरनिहाय केले जाणारे ८ ते ९ तासांचे भारनियम वेगवेगळे लादले जात आहे. विशेत: मुस्लीमबहुल भागात सर्वाधिक भारनियम होत असल्याने हा दूृजाभाव का, असा प्रश्न किशोर बोरकर, बबलू शेखावत, विलास इंगोले, गाजी जेहरोश आदींनी उपस्थित केला. वीज तुटीचे कारण पुढे करीत शंभर टक्के वसुली असताना नाहकपणे भारनियमन करण्यात येऊ नये, अशी मागणी शहर काँग्रेसने केली आहे. कडबी बाजार येथील वीज तक्रार निवारण केंद्र सतत बंद असल्याने येथील अभियंत्याला त्वरित निलंबित करण्याची मागणी प्रशांत डवरे यांनी केली. शहर काँग्रेस पदाधिकाºयांच्या तीव्र भावना लक्षात घेता शहरातील भारनियम येत्या आठवडाभरात बंद करण्यासह अन्य मुद्यावर योग्य कारवाईचे आश्वासन अधीक्षक अभियंता मेत्रे यांनी दिले. यावेळी राजा बांगळे, राजेश चव्हाण, वंंदना कंगाले, शेख आसिफ, साहेबराव घोघरे, हरिभाऊ मोहोड, अभिनंदन पेंढारी, देवायनी कुर्वे, अर्चना सवाई, जयश्री वानखडे, निसार मन्सुरी, नदीम मुल्ला, सागर देशमुख, योगिता गिरासे, कुंदा अनासाने, इसराईल खान, नसीम खान, अनिल माधोगडीया, सुगमचंद गुप्ता व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आहेत आंदोलनातील मागण्या
मजीप्राद्वारा एकदिवसा आड पाणीपुरवठा केला जात आहे. नेमके याच वेळी होणारे भारनियम बंद करावे, नवरात्र महोत्सव लक्षात घेता भारनयिमन करू नये, शेतकरी अर्जमाफीचे अर्ज आॅनलाईन भरण्यात येत असून भारनियमामुळे अडथळा होत आहे. भाजीबाजार परिसरातील फिडरवर असलेले वीज ग्राहकांची संख्या लक्षात घेता. या भागासाठी स्वतंत्र्य फिडर देण्यात यावे, मुस्लीमबहुल भागातील भारनियमनात केला जाणारा दुजाभाव त्वरित थांबविण्यात यावा सर्वांना समान न्याय द्यावा. येत्या आठवड्यात शहराला भारनियमन मुक्त करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.