कर आकारणीवरून काँग्रेस, भाजपा ‘आमने- सामने’

By admin | Published: March 1, 2016 12:10 AM2016-03-01T00:10:22+5:302016-03-01T00:10:22+5:30

शहरातील अनधिकृत बांधकामावर होणाऱ्या कर आकारणीवरून काँग्रेस आणि भाजपाचे सदस्य ‘आमने- सामने’ आलेत

Congress, BJP 'face-to-face' | कर आकारणीवरून काँग्रेस, भाजपा ‘आमने- सामने’

कर आकारणीवरून काँग्रेस, भाजपा ‘आमने- सामने’

Next

जोरदार नारेबाजी : सभागृहाचा निर्णयाला आयुक्त जुमानत नसल्याचा आरोप
अमरावती : शहरातील अनधिकृत बांधकामावर होणाऱ्या कर आकारणीवरून काँग्रेस आणि भाजपाचे सदस्य ‘आमने- सामने’ आलेत. एकमेकांविरुद्ध जोरदार नारेबाजी देत अर्धा तास गोंधळ घातला. एका बाजुला काँग्रेस, राष्ट्रवादी फ्रंट तर दुसऱ्या बाजुला सेना, भाजप, रिपाइं- जनविकासचे सदस्य होते. अनधिकृत बांधकामावर सहा की दोन पट? कोणत्या पद्धतीची कर आकारणी करावी, यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावावरुन महापालिकेत सोमवारी रणकंदन झाले.

प्रशासनावर तीव्र नाराजी
अमरावती : सभागृहाने दोन टक्के करवाढ सुचविली असताना प्रशासनाकडून सहापट करआकारणी केली जात आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावून वसुली होत असल्याचा आरोप शिवसेना-भाजपने केला आहे.
यापूर्वी करआकारणीबाबत स्पष्ट निर्णय घेत तसा ठराव मान्य करूनही प्रशासनाने हा ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविला. मात्र, त्याबद्दल शासनाने काही कळविले नाही. असे असताना महापालिका सहापट करआकारणी करून वसुली करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असताना तो मंजूर करून आणण्याची जबाबदारी भाजप-सेनेची आहे, असे पक्षनेता बबलू शेखावत, विलास इंगोले, अविनाश मार्डीकर म्हणाले. मात्र, यापूर्वी सभागृहात दोनपट करआकारणीचा निर्णय झाला असताना प्रशासन मनमानी करीत असल्याचे प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, तुषार भारतीय, प्रवीण हरमकर, बाळासाहेब भुयार, सुजाता झाडे, प्रशांत वानखडे, प्रदीप दंदे, राजेंद्र तायडे म्हणाले. दरम्यान सत्ता पक्ष आणि विरोधी सदस्यांनी महापौर, आयुक्तांच्या पीठासीनासमोर येऊन ‘जिंदाबाद, मुर्दाबाद’चे नारे दिले.

अन् दिगंबर डहाके आक्रमक
दिगंबर डहाके यांनी आयुक्त गुडेवारांच्या कामकाजावर बोट ठेवले. महापालिकेत कर्मचारी दहशतीत वावरत असून महिलांना सन्मानाने वागणूक द्या, अपमानित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे म्हणत डहाके आक्रमक झालेत. हुकूमशाही चालणार नाही. कौतुकाचे फोटो छापा पण, रात्री १०.३० वाजता कंत्राटदाराला बंगल्यावर कशाला बोलावता, हेदेखील शहरवासियांना कळू द्या. ‘स्मार्ट सिटी’चे श्रेय एकट्याने घेण्याचा प्रकार चालविल्याचे आरोप त्यांनी आयुक्तांवर केले.

आयुक्तांना भाजपने आणले; बदली करुन दाखवा- शेखावत
महापालिकेत आयुक्त म्हणून चंद्रकांत गुडेवार यांना भाजपने आणले आहे. ते मुंबई महापालिका अधिनियमानुसार कामकाज करीत असताना कुणाचे ऐकत नसतील तर त्यांच्याशी दोन हात करा. त्यांची बदली करा, असे पक्षनेता बबलू शेखावत यांनी सेना-भाजप सदस्यांकडे बोट दाखविले.

आणीबाणीची परिस्थिती नाही- हरमकर
अनधिकृत बांधकामावर करआकारणीचे अधिकार आयुक्तांना आहेत. मात्र, सभागृहात दोन पट करआकारणीचा निर्णय झाला असताना सहापट वसूल केले जात आहे. ही वेळ आणीबाणीचा नाही. सभागृहाचे अधिकार सर्वोच्च आहे, असे विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर म्हणाले.

- तर राजीनामा देईन- आयुक्त
माझ्या बंगल्यावर रात्री कोणी कंत्राटदार आल्याचे सिद्ध झाल्यास आयुक्तपदाचा राजीनामा देईन, असे आयुक्त चंद्रकात गुडेवार यांनी सभागृहात जाहीर केले. वैद्यक ीय आरोग्य पदावर तज्ज्ञ व्यक्तीची निवड करण्यासाठी प्रयत्न आहे. २० वर्षांपासून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही. त्यामुळे हुशार आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी धावपळ आहे. आतापर्यंतचे निर्णय नियमानुसार घेतले आहेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Congress, BJP 'face-to-face'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.