शेतकऱ्यांसह जनसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:20 PM2018-12-04T22:20:47+5:302018-12-04T22:21:14+5:30
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे. शेती व्यवसाय डबघाईस आला आहे. मात्र, सरकारने या गंभीर समस्येकडे पाठ फिरवली आहे. ती दूर करण्यासाठी काँग्रेस जनसंघर्ष यात्रेद्वारे थेट जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती अ.भा. काँग्रेस कमेटीच्या सचिव, आमदार यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत दिली.
शेतकरी हित व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी निघालेली जनसंघर्ष यात्रा ही ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता वलगाव येथील एस.एल. हायस्कूलच्या प्रांगणात जाहीर सभा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, राज्य प्रभारी आशिष दुवा, माजीमंत्री आरिफ नसीम खान, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित राहतील. आ. यशोमाती ठाकूर यांच्या आरोपानुसार, साडेचार वर्षांत केवळ आश्वासनाची खैरात भाजपकडून वाटली जात आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. असे असताना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. झोपेत असलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची जनसंघर्र्ष यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे. यावेळी झेडपीचे सभापती जयंत देशमुख, राजीव ठाकूर, हरीश मोरे, आबीद हुसेन उपस्थित होते.
लोकसभेच्या जागेसाठी आग्रही
लोकसभा मतदार संघाची जागा ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आगामी लोकसभा निवडणूका सुध्दा कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे संकेत आहे. जिल्ह्यात जनाधार हा काँग्रेस पक्षाचे बाजूने राहीला असून तो सध्याही कायम आहे. झेडपीसह स्थानिक स्वराज्य संस्थावर काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाने लढवावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केला जाईल, असेही आ. ठाकूर म्हणाल्या.
आरक्षण आर्थिक निकषावर असावे
राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु आरक्षण देताना आरक्षण हे आर्थिक निकषावर असावे, असे मत आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने नियोजन केले होते. तेच नियोजन सध्याच्या सरकारने आखून आरक्षण दिले आहे. यासोबतच धनगर, मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.