राणा दाम्पत्य हे भाजपचे झोमॅटो 'डिलिवरी कपल', काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 10:43 AM2022-05-17T10:43:26+5:302022-05-17T11:55:53+5:30

खोटे प्रमाणपत्र खरे ठरवण्यासाठी भाजप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राष्ट्रवादी, असा दुहेरी डाव हे नौटंकी दाम्पत्य खेळत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी केला आहे. 

congress leader dilip yedatkar criticizes mp navneet rana and mla ravi rana amid hanuman chalisa row politics | राणा दाम्पत्य हे भाजपचे झोमॅटो 'डिलिवरी कपल', काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

राणा दाम्पत्य हे भाजपचे झोमॅटो 'डिलिवरी कपल', काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

googlenewsNext

अमरावती : महाराष्ट्रात हनुमान चालीसेवरून जोरदार राजकारण सुरू आहे. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर थेट दिल्लीला पोहोचले आणि तेथे त्यांनी हनुमान चालीसा पठण केले. राणा दाम्पत्य हे भाजप नावाच्या झोमॅटो कंपनीचे डिलिव्हरी कपल असून एकाच वेळेस भाजप व राष्ट्रवादी अशा दोन होड्यांमध्ये ते स्वार आहेत. खोटे प्रमाणपत्र खरे ठरवण्यासाठी भाजप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राष्ट्रवादी, असा दुहेरी डाव हे नौटंकी कपल खेळत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी केला आहे. 

एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार नवनीत राणा यांनी तोडलेले तारे अदभूत असून आगामी ऑलम्पिकमध्ये कोलांटउडी हा खेळ ठेवल्यास नवनीत राणा यांना गोल्डमेडल मिळेल याची शंभर टक्के खात्री असल्याचा टोलाही ॲड. एडतकर यांनी लगावला. 

आपण भाजपतर्फे लढणार का? या अनेकवेळा विचारलेल्या प्रश्नाला नवनीत राणा यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळत आपण अपक्ष खासदार असल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादीच्या कोट्यातून काँग्रेसच्या बळावर त्या निवडून आल्याचे स्पष्ट असताना स्वतःच्या अपक्ष विजयाचा टेंभा त्यांनी मिरवणे निषेधार्ह आहे. केवळ जातीचे प्रमाणपत्र वैध ठरावे, किमान तारखांवर तारखा पडून २०२४ उजाडावे म्हणून भाजपाशी त्यांची लगट असल्याचा आरोप एडतकर यांनी केला.  

राणा दाम्पत्याने भाजपची नोकरी स्वीकारली असून सध्या ते रोजंदारीवर आहेत. मुंबईत अटक झाल्यानंतर भाजपने हवी तशी साथ दिली नाही, नोकरीत कायमही केले नाही म्हणून नाराज असलेल्या जोडप्याने दिल्लीत हनुमान चालीसा पठणाचा 'शो' केला. परंतु अद्याप त्यांच्या आकांनी याची दखल घेतलेली नाही, म्हणून आता प्रसिद्धीमाध्यमांना या दाम्पत्याने हाताशी धरले आहे, असे एडतकर म्हणाले.  

अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाबत नरमाईचे धोरण का स्वीकारता, या प्रश्नावर नवनीत राणा यांनी शरद पवार ८२ वर्षाचे असताना कोरोना  काळातही ते राज्यभर फिरले परंतु तरुण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र घरी बसून होते, अशी मखलाशी केल्यामुळे नवनीत राणा आणि राष्ट्रवादीची ही जवळीक आगामी लोकसभा निवडणुकीत परत एकदा राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आहे की भाजप - राष्ट्रवादीच्या मैत्रीतील छुपा दुवा आहे ? याचा खुलासाही संबंधितांनी करण्याची गरज असल्याचे दिलीप एडतकर यांनी  म्हटले आहे.

ये परत ये नवनीतताई मातृभूमीला, शेतकर्‍यांचा प्राण तळमळला

महाराष्ट्राची दुर्दशा होत आहे म्हणून दिल्लीत हनुमान चालीसा पठण करणाऱ्या नवनीत राणा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी साधी भेटही दिलेली नाही. त्यामुळे दिल्लीतच ठाण मांडून बसलेल्या राणा दाम्पत्याने आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बियाण्याचा, खतांचा भेडसावणारा प्रश्न मतदारसंघात हनुमान चालीसा पठण करून सोडवावा, असे आवाहन एडतकर यांनी केले आहे. दरवर्षी नांगरलेल्या शेतात पुन्हा नांगर टाकून जी छायाचित्र आपण प्रकाशित करता. त्या छायाचित्रांची वाट मतदारसंघातील जनता चातकाप्रमाणे पहात असल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.

Web Title: congress leader dilip yedatkar criticizes mp navneet rana and mla ravi rana amid hanuman chalisa row politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.