'मोदी सरकार सातत्यानं शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे'; यशोमती ठाकूर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2022 02:58 PM2022-08-05T14:58:35+5:302022-08-05T15:00:01+5:30
काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी महागाईवरुन भाजपावर टीका केली आहे.
अमरावती- देशातील महागाईविरोधात काँग्रेसने देशभर निदर्शने सुरू केली आहेत. राजधानी दिल्लीतही काँग्रेसकडून महागाईविरोधात निदर्शने सुरू असताना पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. सध्या काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात आंदोलनासाठी बसले आहेत. महाराष्ट्रातही मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपावर निशाणा साधला.
केंद्रातील मोदी सरकारने दुजाभाव करीत सामान्य जनतेचा छळ चालविला आहे. हे सरकार शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करीत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांनाही त्रास दिला जात असून महागाई आणि दडपशाही या मोदीनितीचा जाहीर निषेध करत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. महागाईविरोधात सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महागाईमुळे लोकांचे खूप हाल होत आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत असल्याचं प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भाजपावर हल्लाबोल केला आहे. लोकशाहीची हत्या होत असल्याचे तुम्ही सर्व पाहत आहात. महागाईविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, पण केंद्र सरकार आम्हाला आंदोलन करू देत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
फक्त जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगी-
दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता संपूर्ण नवी दिल्लीत कलम 144 लागू असल्याचे सांगितले. अशा स्थितीत आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. कलम 144 चे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नवी दिल्ली क्षेत्राच्या डीसीपीने हे पत्र काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना 4 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला लिहिले होते. माहितीसोबतच इशाराही देण्यात आला होता. तरीदेखील काँग्रेसने आंदोलन केल्यामुळे अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विशेषत: पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व व्हीव्हीआयपींच्या घराभोवती मोठा बंदोबस्त तैनात आहे.