अनियमिततेच्या मुद्यावरून काँग्रेस सदस्य आक्रमक
By admin | Published: January 14, 2015 11:00 PM2015-01-14T23:00:51+5:302015-01-14T23:00:51+5:30
महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ब्युटीपार्लर प्रशिक्षण व संगणक प्रशिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने जि.प.च्या सभेत काँग्रेस सदस्य
अमरावती : महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ब्युटीपार्लर प्रशिक्षण व संगणक प्रशिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने जि.प.च्या सभेत काँग्रेस सदस्य विक्रम ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. सभागृहातील इतरही सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
महिला, बालकल्याण विभागामार्फत मुलींना ब्युटी पार्लर व संगणक प्रशिक्षण देण्यासाठी लाखो रुपयांची तरतूद केली जाते. या अंतर्गत सन १३-१४ मध्ये जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने एमएससीआयटी प्रशिक्षण तसेच ब्युटी पार्लर प्रशिक्षण एका खासगी संस्थेला कंत्राट देऊन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषद सदस्यांच्या नावाने प्रत्येकी १० उमेदवारांच्या नावाची शिफारस घेऊन संबंधित प्रशिक्षण दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु ज्या संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. त्या संस्थेचा नाव व पत्ता सदस्यांना माहीत नाही.
विशेष म्हणजे एमएससीआयटी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र हे केवळ महाराष्ट्र राज्यापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या ट्रीपल सी सारखे प्रशिक्षण उमेदवारांना दिल्यास त्याचा फायदा देशभरात कुठेही होऊ शकतो. मात्र असे प्रशिक्षण न देता प्रशिक्षणाचे नावावर लाखो रुपये खर्चूनही याचा प्रत्यक्ष फायदा कुठल्याही उमेदवाराला झाला नसल्याने याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सभागृहात सदस्य विक्रम ठाकरे यांनी रेटून धरली. या मुद्यावर सभागृहाचे वातावरणही तापले होते. अखेर प्रशासनाने याची लेखी स्वरुपात माहिती सदस्यांना देण्याचे आश्वासन दिल्यामुळे सभागृहाचे वातावरण निवळले.
त्याशिवाय सभेत शिक्षण विभागाच्या मार्फत जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना कम्पाऊंड बांधकामाच्या संदर्भात नियोजन करताना कुठलीही माहिती तालुकास्तरावरील अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांना देण्यात आली नसल्याने या मुद्यावर अभिजीत ढेपे, सुधीर सूर्यवंशी, सुरेखा ठाकरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारला. सभागृहाचे वातावरण तापल्याचे पाहून शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करुन पुन्हा नियोजन करुन सुटलेल्या शाळा समाविष्ट करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. याशिवाय इतरही मुद्यांवर सभेत वादळी चर्चा झाली.
विषय सूचीवरील एकूण १६ विषय गोंधळात मंजुर करुन सभा आटोपती घेण्यात आली. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, सदस्य बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, सुधीर सूर्यवंशी, प्रताप अभ्यंकर, रवींद्र मुंदे, मनोहर सुने, अभिजीत ढेपे, ममता भांबुरकर, सभापती विनोद टेकाडे, आशिष धर्माळे, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंघवी, महेंद्र गैलवार, उमेश केने, सदाशिव खडके, श्रीपाल पाल व सर्व जि. प. व पं.स. सभापती तसेच सीईओ अनिल भंडारी, के.एम. अहमद, भागवत, यु.जी. क्षीरसागर व अधिकारी उपस्थित होते.