काँग्रेसची पुन्हा मुसंडी, सहा जागी सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:04 PM2017-12-27T23:04:47+5:302017-12-27T23:05:11+5:30
नव्या वर्षांत मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : नव्या वर्षांत मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली. पाच जागांवर काँग्रेसचे सरपंच निवडून आले. मोर्शी तालुक्यातील मनीमपूर ग्रामपंचायतीत काँग्रेसचे सरपंच यापूर्वीच अविरोध निवडून आले आहेत. भाजपने चार जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन तर शिवसेनेने एका जागेवर विजयाचा दावा केला आहे.
मंगळवारी मतदान पार पडल्यावर बुधवारी निकाल जाहीर झाले. यात अचलपूर, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, मोर्शी व धारणी तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोणत्याही पक्षाने अधिकृत माहिती जाहीर केली नसली तरी भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या तालुक्यांमध्येच भाजपपक्षाची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. मनीमपूर ग्रामपंचायत अविरोध असल्याने निकालाची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी करतील.
मोर्शी तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या रिद्धपूरच्या सरपंचपदी काँग्रेसचे गोपाल नामदेवराव जामठे ४९८ मते मिळवून विजयी झाले. ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या चुरसीच्या लढतीत विजय जनार्दन टेकाडे यांना २८१ मते मिळवित चक्रधर अंबादास दिवे यांच्यावर अवघ्या १५ मतांना विजय मिळविला. दिवे यांना २६६ मते प्राप्त झाली. गोराळा येथे सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत मीना शंकरसिंह सोळंके यांनी १९२ मते मिळवित विजय संपादन केला. अचलपूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. यात निमदरी येथे सरपंचपदासाठी काँग्रेस समर्थित उमेदवार अलका रामदास सावलकर यांनी ३१७ मतांसह विजय मिळविला. देवगावमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार रेखा गजानन येवले यांनी ५४० मते घेत विजय मिळविला. पिंपळखुटा येथे लता गोपाल चावडेर यांनी २७३ मतासह विजयी झाल्या, तर काठोरा येथे आशिष नारायण काळे यांनी ३३४ मते घेत विजय मिळविला. भाजपने उर्वरित तीन जागांवर दावा केला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हयापूर येथे राजू भारसाकळे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार जया पंजाब गवई यांचा विजय झाला. त्यांना ३०४ मते मिळाली. जवळा येथे अविनाश पदार व रमेश मातकर गटाच्या उमेदवार रेखा भीमराव इंगोले यांनी सरपंचपदी विजय मिळविला. चांदूर रेल्वे तालुक्यात पाथरगाव येथे अंकुश बाबाराव इरपाते यांनी ५२४ मते घेत विजय संपादन केला. येथे काँग्रेसचे पाच सदस्य निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. इरपाते काँग्रेस समर्थित उमेदवार होते. कारलाच्या सरपंच म्हणून गिरासे पॅनलच्या दीपाली जाधव यांनी विजय मिळविला. येथे भाजपने गिरासे पॅनलसोबत आघाडी केली होती. या पॅनलचे सहा सदस्य निवडून आले. काँग्रेस समर्थित उमेदवाराला एका जागेवर समाधान मानावे लागले. महिला पोलिंग पार्टीमुळे चर्चेत आलेल्या धारणी तालुक्यातील भोंडीलावा येथे सरपंचपद तसेच एका सदस्यपदासाठी निवडणूक झाली. यात गोविंद बज्जा कासदेकर यांनी १०९ मते मिळवित विजय संपादन केला. वॉर्ड क्रमांक १ साठी झालेल्या सदस्यपदाच्या निवडणुकीत १२६ मते घेत बालाजी मनू मोरेराना यांनी विजय मिळविला. येथे चार सदस्य अविरोध झाले, तर दोन जागा रिक्त राहिल्या.