उपसरपंचांसह काँग्रेस पुरस्कृत चार सदस्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:57 PM2018-01-29T22:57:06+5:302018-01-29T22:57:26+5:30
आॅनलाईन लोकमत
कुऱ्हा : तिवसा तालुक्यातील सर्वांत मोठ्या कुऱ्हा ग्रामपंचायतीतील काँग्रेस समर्थित पाच सदस्यांपैकी उपसरपंचासह चौघांनी २५ जानेवारी रोजी पदाचा राजीनामा दिला.
१७ सदस्यसंख्या असलेल्या कुºहा ग्रामपंचायतची निवडणूक २०१५ मध्ये झाली. या निवडणुकीत भाकप व काँग्रेस यांनी आघाडी केली होती. ग्रामपंचायतीत भाकप पुरस्कृत ७, काँग्रेस पुरस्कृत ५, भाजप ४, तर अपक्ष १ सदस्य निवडून आले. सरपंचपद भाकपकडे, तर उपसरपंचपद काँग्रेसकडे गेले. अडीच वर्षांत दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये नाराजीचे सूर निर्माण झाले होते. ग्रामपंचायत च्या पहिल्याच आमसभेपासून त्याची चुणूक मिळाली होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर काँग्रेस पुरस्कृत सदस्यांना सरपंचपद मिळाले नसल्याच्या नाराजीतून ही कृती घडल्याचे राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे.
उपसरपंच सै. जहांगीर सै. जाफर, अमोल बंगरे, शहजाद पटेल, सविता राऊत या चार ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसचिवाकडे २५ जानेवारीला राजीनामे सादर केले.
राजीनाम्यावर बुधवारी चर्चा
राजीनाम्यावर ग्रामपंचायतने ३१ जानेवारीला मासिक बैठक बोलावली आहे. यामध्ये राजीनाम्यांवर सदस्यांसमोर सत्यापन केले जाईल. त्यावर चर्चा करून व ठराव घेऊन रिक्त पदांचा अहवाल पंचायत समितीकडे पाठविला जाईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील मोंढे यांनी दिली.