काँग्रेस, शरद पवार गटाचे खातेही उघडले नाही; दिग्गज नेते झाले पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 11:48 AM2024-11-24T11:48:07+5:302024-11-24T11:48:58+5:30
Amravati Assembly Vidhan Sabha Election 2024 Live Results : अनपेक्षित निकालाने महाविकास आघाडीला धक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना आश्र्चयाचा धक्का बसला आहे. अमरावती जिल्ह्यात आठपैकी सात जागा महायुतीच्या वाट्याला, तर एक जागा उद्धवसेनेच्या वाट्याला गेली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाला खातेही उघडता आले नाही, हे विशेष.
गत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातून काँग्रेसचे तीन, दोन अपक्ष, दोन प्रहार तर एक भाजपचे आमदार निवडून आले होते. मात्र यंदा अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजना, मतांच्या ध्रुवीकरणाला ब्रेक, एकसंघ महायुती आणि नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांवर मात करून महायुतीचे नेते मतदारांच्या सामोरे जाताना दिसून आले. त्यामुळे अमरावतीत सुलभा खोडके, बडनेरात रवी राणा, धामणगाव रेल्वे प्रताप अडसड, मोर्शी चंदू यावलकर, अचलपूर प्रवीण तायडे, मेळघाट केवलराम काळे, अचलपूर राजेश वानखडे हे महायुती आणि दर्यापुरातून गजानन लवटे हे महाविकास आघाडीतून विजयी झाले. यावेळी काँग्रेसने तिवसा, अचलपूर, धामणगाव रेल्वे, मेळघाट व अमरावती या पाच जागांवर निवडणूक लढविली. परंतु, एकही जागा जिंकता आली नाही.
महाविकास आघाडीतून शरद पवार गटाने मोर्शीची जागा लढविली असली तरी गिरीश कराळे यांना मते फार कमी मिळाले. उद्धवसेनेने बडनेरा आणि दर्यापूर या दोन जागा लढवित दर्यापुरातून गजानन लवटे हे एकमात्र महाविकास आघाडीतून विजयी झाले आहेत.
दिग्गज नेते झाले पराभूत
अमरावती जिल्ह्यातून राज्याचे नेतृत्व करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि काँग्रेसच्या नेत्या तथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनादेखील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. बच्चू कडू यांना भाजपने अचलपूर मतदारसंघात पहिल्यांदाच उमेदवारी दिलेल्या नवख्या प्रवीण तायडे यांनी पराभव केला. या हेविवेट पराभवामुळे अनेकांना अक्षरशः धक्का बसला आहे. निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत यशोमती ठाकूर, बच्चू कडू हे माघारीवरच राहिले. महायुतीच्या लाटेत दिग्गज उमेदवारांना गारद व्हावे, असाच काहीसा निकाल विधानसभा निवडणुकीत लागला आहे.
बसपा, वंचित, मनसे उमेदवारांनाही नाकारले
अमरावती मतदारसंघातून मनसेचे मंगेश उर्फ पप्पू पाटील यांनी २५४५, तर बसपाच्या मेघा तायडे यांना ११६७ 9 मते मिळाली. बडनेरा मतदारसंघातून बसपाचे रमेश नागदिवे यांना ३५०२ मते मिळविली. मेळघाटातून बसपाचे मोतीलाल ठाकरे यांना १५९३ मते, तिवस्यातून बसपाचे डॉ. मुकुंद डोणे यांना १०७३ मते घेतली. तथापि, दर्यापुरातून वंचित बहुजन आघाडीचे अंकुश वाकपांजर यांनी २१ हजार २६३ मते घेतली. अमरावतीतून वंचित बहुजन आघाडीचे राहुल मेश्राम यांनी ३०४८ मते घेतली. धामणगाव रेल्वे मतदार संघातून वंचितचे नीलेश विश्वकर्मा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. एकंदर विधानसभा निवडणुकीत बसपा, वंचित, मनसे उमेदवारांनाही नाकारल्याचे चित्र आहे.