काँग्रेसला शिवसेनेची साथ, भाजपवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:00 AM2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:19+5:30
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ६ जानेवारी रोजी ३१ व्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. झेडपीचे तख्त काँग्रेस राखणार, हे जवळपास निश्चित असल्याने भाजपला आपल्या राजकीय खेळीवर निवडणूकीपूर्वीच पाणी सोडावे लागले. सोमवारी सकाळी ११ पासून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाआघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने काँग्रेसने जिल्हा परिषदेचा सत्तासोपान सर केला. भाजपला मात देत काँग्रेसने पुन्हा ‘मिनी मंत्रालया’वर वर्चस्व राखले. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी अध्यक्षपद स्वत:कडे खेचून आणले, तर शिवसेनेने नव्या चेहऱ्याला संधी दिली. शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण जिल्हा परिषदेचे नवे उपाध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, बबलू देशमुख यांनी २००९ ते २०१२ या कालावधीतसुद्धा अध्यक्षपद भूषविले होते.
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ६ जानेवारी रोजी ३१ व्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. झेडपीचे तख्त काँग्रेस राखणार, हे जवळपास निश्चित असल्याने भाजपला आपल्या राजकीय खेळीवर निवडणूकीपूर्वीच पाणी सोडावे लागले. सोमवारी सकाळी ११ पासून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. काँग्रेसच्यावतीने अध्यक्षपदासाठी बबलू देशमुख यांंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून काँग्रेसचे सदस्य सुरेश निमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य राजेंद्र बहुरूपी आणि शिवसेनेचे सदस्य गणेश सोळंके यांनी स्वाक्षरी केली. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली. यावर काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, सेनेचे दत्ता ढोमणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुशीला कुकडे आदी सूचक होते. प्रत्येकी एका जागेसाठी या दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून दोन्ही पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.
विशेष म्हणजे, राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकणाºया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान विरोधात असलेला युवा स्वाभिमान (२ सदस्य), राष्ट्रवादी काँग्रेस (पटेल गट) (३ सदस्य), प्रत्येकी एक सदस्य असलेले बसपा, लढा व अपक्ष यांनी महाविकास आघाडीसोबत घरोबा केल्याने विरोधकांच्या गोटात भारतीय जनता पक्ष पूर्णत: एकाकी पडला. भाजपला सत्तास्थापनेसाठी लागणारे पुरेसे संख्याबळ जुळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षनेत्यांनी निवडणूकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. परिणामी जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे बबलू देशमुख आणि शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, जिल्हा परिषद सभागृहात दुपारी ३ वाजता विशेष सभा पार पडली. निवडणुकीच्या कामकाजासाठी पीठासीन अधिकारी म्हणून अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तर सहायक पीठासीन अधिकारी नायब तहसीलदार प्रवीण देशमुख होते. सभेत बबलू देशमुख यांची अध्यक्ष व विठ्ठल चव्हाण यांनी उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाडे प्रमोद देशमुख, किशोर झोंबाडे, प्रकाश माहुरे, विजय शेलूकर, संजय राठी, नीलेश तालन, पंकज गुल्हाने, अविनाश हुसे, समीर लेंधे, विजय कविटकर, विजय उपरीकर आदींनी कामकाजात सहकार्य केले. विजयाची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या आवारात महाविकास आघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
मंत्री, आमदार, पदाधिकारी उपस्थित
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकी दरम्यान सकाळपासून राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक रवींद्र दरेकर, शिवसेनेच्या प्रीती बंड, जिल्हाप्रमुख श्याम देशमुख, राजेश वानखडे, सुनील खराटे, नाना नागमोते, नाना वानखडे, धनंजय बंड, प्रवीण अळसपुरे, आशिष धर्माळे, उमेश अर्डक, उमेश घुरडे, बाळा भागवत, राष्ट्रवादीचे राजाभाऊ कुकडे, राजेंद्र बहुरूपी, बाळू कोहळे, सुभाष शळके, विष्णू निकम, अजिज पटेल आदी नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सभापतिपदांसाठी २० जानेवारीला विशेष सभा?
जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सदस्यांच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाºयांनी २० जानेवारी रोजी विशेष सभा आयोजित केली जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना नोटिशी लवकरच पाठविल्या जाणार आहेत. प्रथम समाजकल्याण समितीवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या सदस्यांमधून, तर दुसºयांदा महिला व बाल कल्याण समितीवर सभापतीची निवड केली जाते. त्यानंतर इतर दोन समित्यांचे सभापती निवडले जाणार आहेत.